धारावीतील ‘बैचेन आन्टी’ ला गोळीबारप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या बैचेन आन्टीने हल्लेखोरांना घरात काही दिवसांपासून आश्रय दिला होता. तसेच तिच्या घरातच हल्ल्याचा कट देखील रचला गेला होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. शमा परवेज शेख (४५) असे या बैचेन आन्टीचे नाव आहे. धारावीत ड्रग्सची विक्री करणारी शमा ही तिच्या धंद्यात आणि परिसरात बैचेन आन्टी नावाने कुप्रसिद्ध आहे. तरुणांना नशेच्या जाळ्यात ओढून त्यांच्या मार्फत गांजा, चरस या अमली पदार्थांची बैचेन (विक्री) करून घेणारी शमा ही धारावीतील राजीव गांधी नगर झोपडपट्टीत राहणारी आहे.
धारावी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल
शनिवारी सकाळी धारावीतील पिला बंगला येथील सार्वजनिक स्वछतागृह या ठिकाणी झालेल्या गोळीबारात अमीर शेख नावाच्या तरुणाचा मृत्यु झाला आहे. या प्रकरणी धारावी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना शमा हिने तिच्या घरात आश्रय दिला होता. हल्लेखोर सराईत गुन्हेगार असून वडाळा येथे राहत आहे. अमीर शेख याची हत्या वर्चस्व गाजवण्यासाठी करण्यात आली होती, अमीर याच्यावर देखील धारावीत पूर्वी गुन्हे दाखल होते. तसेच त्याने शमाला ड्रग्सच्या धंद्यात देखील अमीरमुळे त्रास सुरू होता. शमाने हल्लेखोरांना राहण्यासाठी स्वतःच्या घरात आश्रय दिला होता व हत्येचा कट देखील शमाच्या घरात शिजला असल्यामुळे धारावी पोलिसांनी कटात सामील झाल्यामुळे बैचेन आन्टी उर्फ शमा हिला सोमवारी अटक केली आहे. परंतु दोन्ही हल्लेखोर फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे विविध पथके त्याच्या मागावर आहेत. हल्लेखोर गुन्हा करतेवेळी आणि त्यानंतर मोबाईल फोन वापरत नसल्यामुळे त्यांना शोधणे पोलिसांना अवघड होऊन बसले आहे. मात्र सीसीटीव्ही आणि खबरीच्या मार्फत या दोघांचा शोध घेतला जात आहे.
(हेही वाचा काँग्रेसच्या ‘त्या’ भूमिकेला राष्ट्रवादीचा विरोध? नवाब मलिक यांचे सूचक विधान)
Join Our WhatsApp Community