अंमलबजावणी संचालनालय (ईडी) टीम 15 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजल्यापासून कुख्यात दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरच्या मुंबईतील घरासह इतर 10 ठिकाणी छापे टाकत आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) माहितीच्या आधारे हे छापे टाकले जात आहेत. ईडीने टाकलेल्या छाप्यांची माहिती यावेळी माध्यमांना देण्यात आलेला नाही. मुंबईत 10 ठिकाणी ईडीने सर्च ऑपरेशन सुरू केल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा या दोन्ही यंत्रणांनी ही संयुक्त छापेमारी केल्याचे कळते. मनी लॉड्रिंग प्रकरणात महाराष्ट्रातील राजकीय नेतेही या प्रकरणात रडारमध्ये येणार असल्याच्या दबक्या आवाजातील चर्चा सध्या सुरू आहेत.
Enforcement Directorate (ED) is carrying out searches at several places linked to the people associated with the underworld, in Mumbai in a money laundering case: Sources
— ANI (@ANI) February 15, 2022
ईडी आणि एनआयएकडून ‘सर्च’ऑपरेशन
मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने दाऊद इब्राहिमविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या आधारे दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित लोकांची यादी तयार करण्यात आली आहे. एनआयएला मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडीचे पथक आज दाऊदची बहीण हसिना पारकर हिच्या मुंबईतील घरावर छापे टाकत आहे. अंमलबजावणी संचलनालयाने मुंबई आणि परिसरात अंडरवर्ल्ड गॅंगस्टर दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेच्या प्रकरणाशी संबंधित छापेमारी सुरू केली आहे. नुकतीच काही प्रकरणात कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेच्या संबंधित प्रकरणात गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणाशी संबंधितच ईडी आणि एनआयएचे ही छापेमारी असल्याचे समोर येत आहे.
(हेही वाचा – कर्नाटकातील मुस्लिम विद्यार्थीनींची हिजाबवरील मागणी वाचून, तुम्हीही व्हाल थक्क!)
या सर्वांची बँक खाती, मोबाईल आणि संगणक यांचाही ईडीकडून शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. ठाण्यातील एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी इक्बाल कासकरला अटक करण्यात आली असून तो तळोजा कारागृहात आहे. यासोबतच ईडी आणि एनआयएची टीम दाऊद इब्राहिम टोळीला आश्रय देणाऱ्यांचाही तपास करत आहे. 12 मार्च 1993 रोजी दाऊद इब्राहिम टोळीने मुंबईत 12 ठिकाणी बॉम्बस्फोटांची मालिका घडवली होती. तेव्हापासून दाऊद इब्राहिम देशातून फरार असून परदेशातून मुंबईसह राज्यात अशांतता पसरवत आहे.