शिवसेना भवनात होणा-या पत्रकार परिषदेची जोरदार चर्चा सुरु आहे. ज्या साडेतीन नेत्यांबद्दल राऊत बोलत आहेत, ते नेते कोण याबाबत मात्र सामान्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच संजय राऊत यांनी परिषदेआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना, आजच्या पत्रकार परिषद पाहण्याचे आवाहन केले आहे. सौ सोनार की और एक लोहार की असं म्हणत, त्यांनी विरोधकांना गर्भित इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत इशारे देत आहेत, त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत कोणता गौप्यस्फोट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हा एक नाजूक विषय
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित ठिकाणांवर मंगळवार सकाळपासून छापेमारी सुरू आहे. त्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. या रेड संदर्भात माझ्याकडे माहिती नाही. राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काही विषय असतील, काही गंभीर गोष्टी असतील आणि केंद्राकडे माहिती असेल, तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य केलं पाहिजे. दाऊदवर काही बोलू नये. काही कारवाई सुरू असेल, तर राज्य आणि केंद्राने एकत्रित काम केलं पाहिजे, असं राऊत म्हणाले. या छापेमारीत मंत्र्यांची नावं पुढे येत आहेत, असं विचारल्यावर राऊत म्हणाले नावं समोर येतील की नावं घुसली जातील हा एक प्रश्नचिन्ह आहे. छत्तीसगड ते पश्चिम बंगालपर्यंत तेच सुरू आहे. मी त्यावर बोलणार नाही. राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय सुरक्षा हा गंभीर आणि नाजूक विषय असतो, असंही त्यांनी सांगितलं.
( हेही वाचा :कोरोनाचा असाही परिणाम, लाखो लोकांच्या सोन्याचा झाला लिलाव पण का? वाचा…)
गुजरातमध्ये ईडी कधी?
गुजरातमध्ये 25 हजार कोटीचा घोटाळा झाला आहे. हा देशातील सर्वात मोठा बँक फ्रॉड आहे. आता ईडी तिथे काय करते ते पाहायचं आहे. तिथे ईडी का जात नाही? दोन वर्षापासून हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला. कोण होते हे लोक? घोटाळा दाबण्यासाठी कुणीकुणी प्रयत्न केले? आरोपी कसे पळाले? हा संशोधनाचा विषय आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्राकडे बोट दाखवले आहे.