शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांविरोधात दंड थोपटले आहेत. लवकरच भाजपचे साडे तीन नेते तुरुंगात असतील, असे विधान संजय राऊत यांनी केले. मंगळवारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन राऊत भाजप विरोधात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा आहे. भाजप नेत्यांची झोप उडेल असेही विधान राऊत यांनी केले आहे. पण आता भाजपच्या नेत्यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
(हेही वाचाः पत्रकार परिषदेपूर्वीच राऊतांचा विरोधकांना गर्भित इशारा! म्हणाले…)
भाजप अशा खोट्या धमक्यांना घाबरणारा पक्ष नाही. आम्हाला झोप न लागण्याचा प्रश्नच येत नाही, ईडीच्या दाऊद इब्राहिम विरुद्ध चालू असलेल्या कारवाईत किती लोकांची झोप उडणार आहे हे संध्याकाळी 4च्या आत राऊतांना कळेल त्यामुळे त्यांनी त्यांची झोप वाचवावी, अशा तिखट शब्दांत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी संजय राऊतांना इशारा दिला आहे.
(हेही वाचाः राऊतांच्या गौप्यस्फोटाआधीच सोमय्यांनी उचलले ‘हे’ पाऊल!)
राऊतांनी स्वतःची झोप वाचवावी
ईडी आणि एनआयए कडून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्रहिम विरोधात कारवाई सुरू असून त्याच्याशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी करण्यात येत आहेत. त्यामुळे राऊतांच्या पत्रकार परिषदेच्या आधीच अनेक राजकीय नेत्यांची झोप उडणार असल्याचे सूचक विधान प्रसाद लाड यांनी केले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी स्वतःची झोप वाचवावी अशी मी त्यांना विनंती करतो, असेही प्रसाद लाड यावेळी म्हणाले.
(हेही वाचाः मुंबईत ‘ईडी’चं ‘सर्च’ऑपरेशन, दाऊदशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी; एका मंत्र्याचीही चौकशी)
तुम्हाला घाबरण्याचं कारण काय?
केंद्रीय तपास यंत्रणा या भारतीय संविधानाने त्यांना दिलेल्या अधिकारांनुसार तपास करत आहेत. तपासादरम्यान जर यंत्रणा एखाद्या राजकीय नेत्यापर्यंत पोहोचत असेल आणि तो नेता खरंच दोषी असेल तर ती यंत्रणा चुकीचं काम करत आहे का? असा प्रश्नही प्रसाद लाड यांनी उपस्थित केला. ठाकरे सरकारच्या सांगण्यावरुन राज्यातील पोलिस यंत्रणा ज्याप्रमाणे भाजप नेत्यांना त्रास देत आहेत त्यावरुन यंत्रणांचा गैरवापर कोण करतंय हे जनतेला दिसत आहे. त्यामुळे तुम्ही जर चुकीची कृत्ये करत नसाल तर तुम्हाला घाबरण्याचे कारण काय?, असा खडा सवालही लाड यांनी केला.
Join Our WhatsApp Community