शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्ला चढवल्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी पहिल्यांदाच यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका ट्वीटच्या माध्यमातून सोमय्या यांनी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे.
संजय राऊत यांनी याआधी माझ्या पत्नीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, आता त्यांनी माझ्या मुलाचे नाव बदनाम करण्याचा घाट घातला आहे. आम्ही कुठलाही भ्रष्टाचार केला नाही. ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचारांविरोधात आमचा लढा चालूच राहील, असे ट्वीट करत सोमय्या यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.
काय आहे सोमय्यांचे ट्वीट?
याआधी 2017 साली संजय राऊत यांच्या सामना वृत्तपत्राने माझी पत्नी मेधा सोमय्या यांचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला. एका बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीच्या व्यवहारात माझ्या पत्नीचे नाव गोवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता माझा मुलगा नील सोमय्या याचे नाव त्यांनी घेतले आहे. आतापर्यंत ठाकरे सरकारने माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांविरुद्ध 10 खटले दाखल केले आहेत. तर अजूनही तीन खटल्यांची प्रक्रिया सुरू आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1493561671847391232?s=20&t=lvfW_uv6Vde8eVsvNJMJ7Q
ठाकरे आणि राऊत गप्प का?
मी त्यांची परिस्थिती समजू शकतो. मी माझ्याविरुद्धच्या आणखी एका तपासाचे स्वागत करतो. आम्ही काहीही चुकीचे केलेले नसून कुठल्याही भ्रष्ट व्यवहारात आम्ही गुंतलेलो नाही, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. कोविड सेंटर घोटाळ्याबाबत ठाकरे आणि राऊत गप्प का? प्रविण राऊत आणि सुजीत पाटकर यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत ते का बोलत नाहीत?, असा सवालही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध चालू असलेला आमचा लढा हा असाच सुरू राहणार आहे, असेही किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1493562197972193280?s=20&t=lvfW_uv6Vde8eVsvNJMJ7Q
Join Our WhatsApp Community