मिठीच्या किनाऱ्यावर बनवणार आता कृत्रिम तलाव आणि जंगलही

134

मिठी नदीच्या विकासावर आजवर सुमारे ११६० कोटी रुपये खर्च करूनही मिठी नदी अजूनही प्रदूषितच आहे. मिठी नदीच्या खोलीकरणाचे काम पूर्ण होऊन संरक्षक भिंतीचेही काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, पुन्हा एकदा मिठी नदीचे खोलीकरण करत मिठीच्या किनारी कृत्रिम तलाव बांधण्यात येणार आहे. या तलावामध्ये नदीतील पाणी वळवण्यासाठी टनेल बांधण्यात येणार असून नदीच्या किनाऱ्यावर कृत्रिम तलाव उभारण्यासाठी आता सल्लागाराची नियुक्ती करण्यात येत आहे. या सल्लागार सेवेसाठी तब्बल ३६ कोटी रुपये मोजले जाणार आहे.

( हेही वाचा : कोरोना काळातील महापालिका रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांना लागली लॉटरी! किती मिळणार रक्कम? )

मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प

मुंबई महापालिकेने मिठी नदीची पूर समस्या दूर करण्यासाठी आणि मिठी नदीची जैवविविधता व पर्यटनवृध्दीसाठी मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प प्रारंभ केला आहे. यामध्ये विशेषत: मिठी नदीची वहन क्षमता वाढवण्यासाठी मिठी नदीचे अधिक खोलीकरण करणे, जपानी तंत्रज्ञानावर आधारीत बोगदा बांधणे, मिठी नदी लगत कृत्रिम तलाव व पाणथळ तयार करणे, नदीला बारामाही वाहते करणे, माहिम खाडीजवळ किंवा इतर ठिकाणी धरण किंवा बंधारे बांधून पंपिंग स्टेशन बनवणे, मिठी नदीत जलवाहतूक करणे, कांदळवनाचा विकास करणे, पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आरेतील मिठी नदीच्या किनाऱ्या लगत कृत्रिम जंगल बसवणे, मिठी नदी किनारी सुशोभिकरण व मनोरंजनात्मक बाबींचा विचार करणे, जैवविविधता जपून मिठीच्या किनाऱ्यालगतच्या भागात आणि मिठी नदीच्या विकास कामांमधून महसूल निर्मिती करणे आदी बाबींचा समावेश आहे.

( हेही वाचा : भाजपचे नगरसेवक मुख्य सचिवांच्या दरबारी! ‘हे’ आहे कारण )

मिठी नदी पुनर्रज्जीव प्रकल्पात प्रदूषण नियंत्रण, घन कचरा व्यवस्थापन, हायड्रॉलिक उपचार सुविधा इत्यादी सारख्या इतर अनेक महत्वपूर्ण तांत्रिक व अभियांत्रिक बाबींचा समावेश आहे. त्यामुळे सल्लागार, लोकप्रतिनिधी, पर्यावरणवादी, शैक्षणिक संस्था महापालिका व इतर शासकीय विभाग यांचे विचार लक्षात घेऊन सामाजिक, पर्यावरणीय, पर्यावरण आणि आर्थिक बाबींची सांगड घालणे आवश्यक आहे. त्यानुसारच या कामांसाठी जागतिक दर्जाचे सल्लागार नियुक्त करण्यासाठी महापालिकेने मागवलेल्या निविदेमध्ये टीपीएफ इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड व पॅसिफि कन्स्ल्टंट ही कंपनी पात्र ठरली असून या कंपनीला सल्लागार सेवेसाठी ३५ कोटी ८७ लाख ९९ हजार ९९२ रुपये मोजले जाणार आहे.

मोठा गैरव्यवहार

मिठी नदीच्या खोलीकरणाच्या कंत्राट कामांमधील खडक फोडण्याच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार झाला असून यावर कॅगनेही ताशेरे ओढले होते. नदीच्या खोलीकरणाचे काम जवळपास पूर्णत्वास आलेले असताना पुन्हा याचे खोलीकरण का केले जाते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच मिठीच्या किनाऱ्याचा परिसर सुशोभित करण्याचा प्रस्ताव यापूर्वी संमत करण्यात आलेला आहे, याचेही उत्तर अद्याप प्रशासनाकडून दिले जात नसल्याने मिठी नदीच्या या प्रस्तावावरून सत्ताधाऱ्यांसह विरोधकही आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.