प्लास्टिकच्या रिकाम्या बाटलीत अडकलेल्या बिबट्याला शोधलं आणि…

144

बदलापूर आणि वांगणीदरम्यान गोरेगाव जंगलातील रिकाम्या पाण्याच्या बाटलीत गुदमरणा-या बिबट्याला अखेर ३० तासांच्या अथक प्रयत्नानंतर शोधण्यात वनविभाग, ग्रामस्थ आणि प्राणीप्रेमींना यश आले. बिबट्या टेहाळणी पथकालाच आपल्यामागे पळवू लागल्याने अखेर त्याला बेशुद्ध करुन पकडले गेले. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान बिबट्याला पकडण्यात यश आले. बिबट्याने तब्बल पाऊण तास सर्वांना आपल्यामागे पळवले. तो ताब्यात येताच सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

बिबट्या रविवार सायंकाळपासून अन्नपाण्याविना होता. परंतु त्याने चपळतेने स्वतःला आम्हा सर्वांपासून वाचवले. त्याला पकडण्यासाठी बेशुद्ध करुन त्वरितच सलाईन दिले गेले. बिबट्याच्या तोंडावर अडकलेली रिकामी बाटली अलगद ओढून काढली गेली. त्याला पुन्हा जीवनदान देण्यात गावकरी तसेच प्राणीप्रेमींनीही मोलाची भूमिका निभावली, अशी माहिती ठाणे प्रादेशिक वनविभागाचे साहाय्यक वनसंरक्षक तुळशीराम झिरवे यांनी दिली. रविवार मध्यरात्रीपासून बिबट्याचा शोध सुरु होता. बिबट्या सध्या बेशुद्ध आहे. थोड्या वेळानंतर शारिरीक तपासणीसाठी अडीच वर्षांच्या बिबट्याची रवानगी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केली जाईल. असेही ते म्हणाले.

( हेही वाचा : बापरे! मुंबईत ओमायक्रॉनचा कहर; जाणून घ्या किती टक्के रूग्णांना झाली बाधा )

बिबट्यासोबत काय घडले

रविवारी रात्री हा बिबट्या तोंडावर अडकलेली पाण्याची बाटली काढण्याच्या प्रयत्नात जंगलातील वळणावरच गाडीसमोर आला. सुदैवाने वाहनचालकाच्या प्रसंगावधानतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रत्यक्षदर्शींनीच ही माहिती वनविभागाला दिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. ठाणे प्रादेशिक वनविभागाच्या बचाव पथकाने तसेच बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बचाव पथकाने बिबट्याला शोधण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ग्रामस्थ तसेच विविध प्राणीप्रेमी संस्थाही बिबट्याला शोधत होत्या.

जंगलात कचरा करु नका…

माणसांचा जंगल परिसरात वाढता हस्तक्षेप वन्यजीवांसाठी घातक ठरत असल्याचे या प्रकरणातून पुन्हा अधोरेखित झाले. जंगलाजवळचे फार्म हाऊस किंवा निसर्ग पर्यटन केंद्रात घनकचरा व्यवस्थापनची योग्य पद्धतीने विल्हेवाट झाली नाही तर पाण्यासाठी मानवी समूहाजवळ येणा-या वन्यजीवांचा जीवही जातो. कित्येकदा पाण्याच्या रिकाम्या कॅनमध्ये अडकून प्राणी-पक्ष्यांचा जीवही गेला आहे. मृत बिबट्याच्या पायावर काचेचे तुकडे आढळले आहेत. तुम्ही जंगल परिसरात वास्तव्यास असताना पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, चिप्सचे प्लास्टिक पेपर्स, काचेच्या बाटल्यांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करा. अन्यथा वन्यजीवांचा नाहक बळी जाईल. असे ठाणे वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक अविनाश हरड यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.