सेनेचे डबेवाला भवनाबाबतचे ‘वचन’ नही बने शासन! 

172

सुप्रसिद्ध बाहुबली चित्रपटातील शिवगामीचा डायलॉग फेमस झाला होता, ‘मेरा वचन ही है मेरा शासन’ असा तो डायलॉग होता. शिवसेनेने डबेवाला भवन उभारण्याच्या विषयावर नेमके उलट केल्याचे दिसत आहे. सेनेने महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीच्या वचननाम्यात मुंबईकरांना त्यांच्या कार्यालयात घरचा गरमागरम जेवणाचा डबा पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांसाठी डबेवाला भवन उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र २०२२ उजाडले, महापालिकेची पुढची निवडणूक तोंडावर आली. तरीही या भवनाबाबत अद्याप संभ्रम आहे.

५ वर्षे उलटल्यावरही वचनाचे स्मरण नाही 

मुंबई महापालिकेच्या २०२२ च्या निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. त्यानिमित्ताने सेनेने २०१७च्या निवडणुकीत दिलेल्या कोणत्या वचनांची पूर्तता झाली याचा ऊहापोह करणे सुरु झाले आहे. त्यातीलच एक डबेवाला भवन उभारणे हे वचन होते. १३० वर्षांची परंपरा असलेल्या डबेवाल्यांची आजमितीस ५ हजार संख्या आहे. मुंबईतील सामाजिक घटकांमध्ये हा घटक महत्वाचा आणि सन्मानाचा समाजाला जातो. मुंबईत कष्टकरी या घटकाला विसाव्यासाठी स्वतःची हक्काची जागा पाहिजे. ही मागणी वारंवार करूनही ती पूर्ण होत नाही. अखेर सेनेने डबेवाल्यांना २०१७ साली आश्वासन दिले, मात्र ५ वर्षे उलटली तरी ती पूर्ण झाली नाही.

(हेही वाचा राऊतांचा सोमय्यांवर निशाणा; म्हणाले “…Wait and watch”)

२०२२च्या निवडणुकीतील वचनाम्याची करावी लागणार प्रतीक्षा? 

याउलट मुंबईत उर्दू घर उभारण्याची मागणी पूर्ण होताना दिसत आहे. त्यामुळे साहजिकच सेनेला डबेवाला भावनाऐवजी उर्दू घर प्राधान्याचे वाटले का, अशी चर्चा सुरु झाली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली, तेव्हा स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी डबेवाला भावनासाठी वांद्रे येथे २८६. चौ.मी. जागा दिल्याचे आश्वासन जाहीर केले. त्यावर मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी समाधान व्यक्त केले. मात्र नुसते सभागृहात सांगून भवन उभे राहत नाही. त्यासाठी तसा ठराव सभागृहात आणावा लागतो, तो मंजूर करावा लागतो. ही प्रक्रिया पूर्णच झाली नाही. आणि आता मार्च २०२२ यामध्ये महापालिकेची टर्म संपत आहे. सेनेच्या सत्तेला स्थगिती मिळत आहे. अशा वेळी केवळ एकच सर्वसाधारण सभा होणार आहे. तोवर हा ठराव कधी करणार आणि तो त्या शेवटच्या सभेत मंजूर होणार का, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे डबेवाला भवन पुन्हा एकदा २०२२ च्या वचननाम्यात समाविष्ट होण्याची दाट शक्यता आहे.

काय म्हणतात डबेवाला? 

याबाबत मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना विचारले असता, सभागृहात स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी डबेवाला भवनाची घोषणा केली आहे. तसे सभेच्या इतिवृत्तात आले आहे. याबाबतचा इतकाच तपशील उपलब्ध आहे. सेनेने यानुसार भवन उभारले अशी अपेक्षा आहे. याशिवाय मुंबईतील डबेवाल्यांना संघटित करून स्वतंत्र कंपनी स्थापन करावी, या कंपनीला पहिल्या वर्षी किमान ५ कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळ द्यावे, सायकल खरेदी/पार्किंगसाठी सहकार्य, मुलांचे शिक्षण, कुटुंबाला आरोग्यसेवा देण्यासाठी कार्पोरेट व सामाजिक विभागांमार्फत मदत उपलब्ध करून द्यावी या आश्वासनांची पूर्तता करावी, असे तळेकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.