ऐन विणीच्या हंगामात राज्यातील दक्षिण किनारपट्टीला भेट देणा-या ऑलिव्ह रिडले कासवाच्या प्रजातीच्या भ्रमणमार्गाचा उलगडा होण्यासाठी वनविभागाच्या कांदळवन कक्ष आणि केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल संस्थेच्या भारतीय वन्यजीव संस्थेने पाच मादी कासवांवर सॅटलाईट टॅगिंगचे काम बुधवारी पूर्ण केले. दोन दिवसांत गुहागर येथील तीन कासवांना सॅटलाईट टॅगिंगचे काम पूर्ण केल्यानंतर पुढील सहा महिन्यांत प्राथमिक अहवाल जाहीर करण्याचा विचार असल्याची माहिती कांदळवन विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी दिली.
ऐन हिवाळाच्या ऋतुमानात ऑलिव्ह रिडले कासवाची प्रजाती अंडी घालण्यासाठी भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर येते. मात्र भारताच्या पश्चिम किनारपट्टीला भेट देणा-या ऑलिव्ह रिडले कासवांच्या भ्रमंतीच्या मार्गाबाबतचा उलगडा होत नव्हता. त्यासाठी सॅटलाईट टॅगिंग करुन राज्यातील किनारपट्टीवर येणा-या ऑलिव्ह रिडले या कासवाच्या प्रजातीचा भ्रमणमार्ग शोधला जाणार आहे. याअगोदर दहा वर्षांपूर्वी लाखांच्या संख्येत येणा-या ओडिशा किनारपट्टीवरील ऑलिव्ह रिडले कासवांवरील अभ्यास पूर्ण झाला आहे.
( हेही वाचा : हद्दच! भजी विकण्यासह ‘तो’ विकत होता कामोत्तेजनेच्या गोळ्या, वाचा कुठे घडला प्रकार )
काय सांगतोय पूर्वेकडील ओडिशा किनारपट्टीवरील ऑलिव्ह रिडले कासवांच्या सॅटलाईट टॅगिंगचा अभ्यास –
भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर येणारे ऑलिव्ह रिडले वेगवेगळ्या ठिकाणांहून किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात असा अंदाज आहे. पूर्वेकडील ऑलिव्ह रिडले यांचा प्रवास श्रीलंकेपर्यंत आढळला आहे. पश्चिम किनारपट्टीवर येणा-या ऑलिव्ह रिडले यांची मूळ जागाही वेगळी असावी, असाही केवळ अंदाज आहे. अशी माहिती कांदळवन प्रतिष्ठान, संशोधन आणि क्षमता बांधणी उपसंचालक मानस मांजरेकर यांनी दिली आहे.
राज्याच्या दक्षिण किनारपट्टीवर सॅटलाईट टॅगिंग झालेले ऑलिव्ह रिडले कासव व त्यांना दिलेली नावे
- ‘प्रथमा’ ही गेल्या जानेवारी महिन्यात पहिली सॅटलाईट टॅगिंग झालेली मादी ऑलिव्ह रिडले कासव ठरली. तिला रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास येथून सॅटलाईट टॅगिंग केले गेले. आतापर्यंत ती नजीकच्या ७५ किलोमीटर समुद्रापर्यंत प्रवास करत असल्याचे निरीक्षण भारतीय वन्यजीव संस्थेच्या संशोधकांनी नोंदवले.
- प्रथमानंतर लगेचच ‘सावनी’ला रत्नागिरीतीलअंजर्ले किनारपट्टीवरून सॅटलाईट टॅगिंग केले गेले. सावनीचे सॅटलाईट टॅगिंगही जानेवारी महिन्यात पूर्ण झाले. ती आतापर्यंत नजीकच्या समुद्रातच दिसली आहे.
- मंगळवारी गुहागर येथून ‘वनश्री’ तर बुधवारी सकाळी ‘रेवा’ आणि ‘लक्ष्मी’ या दोन ऑलिव्ह रिडले कासवांनाही सॅटलाईट टॅगिंग केले गेले.
आतापर्यंत प्रथमा आणि सावनीच्या हालचाली किनारपट्टीजवळच आहेत. पाचही ऑलिव्ह रिडले कासव मार्च महिन्यापर्यंत खोल समुद्रात जातील, असा अंदाज आहे. असे भारतीय वन्यजीव संस्था देहरादून येथील प्रकल्प संशोधक डॉ सुरेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : शेट्टी बहिणींनी ओढावली पक्षीप्रेमींची नाराजी! काय आहे कारण? )
सॅटलाईट टॅगिंग प्रकल्पाचा खर्च
या प्रकल्पासाठी वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानाने ९ लाख ८३ हजारांचा खर्च उचलला आहे. तीन सॅटलाईट टॅगिंगसाठी हा खर्च आल्याची माहिती अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी दिली. भारतीय वन्यजीव संस्थेने त्यांच्याकडील दोन सॅटलाईट टॅगिंगचे यंत्र स्वखर्चाने प्रकल्पासाठी वापरले.
ऑलिव्ह रिडले कासवाविषयी
- जगभरातील उष्ण कटिबंधीय किनार-यावर ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजाती आढळतात. भारतात प्रामुख्याने ओडिशा किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासव दिसून येतात. पश्चिम किनारपट्टीवर गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ येथेही ऑलिव्ह रिडले दिसतात.
- जगभरातील प्राणी-पक्ष्यांच्या अस्तित्वाची माहिती देणा-या इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑन नेचरने ऑलिव्ह रिडले कासवाची प्रजाती जगभरात असुरक्षित असल्याचे जाहीर केले आहे.
- भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार पहिल्या वर्गवारीत ऑलिव्ह रिडले कासवाला संरक्षित केले आहे.
- या कासवाचे वजन ५० किलो तर उंची ७० सेमीपर्यंत आढळते.
- या ऑलिव्ह रिडले कासवातील मादी कासव नोव्हेंबर ते मार्च महिन्यात किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. साधारणतः पन्नास दिवसांच्या अंतराने अंड्यातून कासवाचे पिल्लू बाहेर येते.
- समुद्रातील जेली फिश ऑलिव्ह रिडले कासवाचे आवडते खाद्य आहे. कासवाच्या पृष्ठभागाचा रंग हिरवा असतो.
- या कासवाच्या शिकारीच्या घटनांचीही नोंद आहे. अंडी खाण्यासाठी तसेच कातड्यांसाठीही ऑलिव्ह रिडले कासवांची शिकार केली जाते. आतापर्यंत राज्यात शिकारीच्या घटनांची नोंद नसल्याची माहिती कांदळवन कक्षाने दिली.