नवी मुंबईच्या सीजीएसटी आयुक्तालयाने सुमारे 21 कोटी रुपये बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा घोटाळा करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे आणि मेसर्स श्री रामएंटरप्राइज (GSTIN: 27FPAPS4153A1Z3) च्या मालकाला अटक केली. ही कंपनी सुमारे 100 कोटी रुपयांच्या बनावट इनव्हॉइसवर फसवे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवणे, वापरणे आणि दुसऱ्याला देण्याचे व्यवहार करत होती.
कंपनी विविध धातूंच्या भंगाराच्या व्यापारात सहभागी
सीजीएसटी नवी मुंबईच्या कर चुकवेगिरी विरोधी पथकाने या कंपनीची चौकशी केली. मालकाने दिलेल्या जबाबानुसार, ही कंपनी विविध धातूंच्या भंगाराच्या व्यापारात सहभागी आहे. तपासात असे आढळून आले की, करदात्याने अस्तित्वात नसलेल्या/बोगस कंपन्यांकडून बनावट आयटीसीचा लाभ घेतला आणि दुसऱ्याला हस्तांतरित केला. आरोपीला केंद्रीय वस्तू व सेवा कायदा, 2017च्या कलम 69 (1) अंतर्गत सदर कायद्याच्या कलम 132 (1) (b) आणि (c) नुसार गुन्हा केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे आणि त्याला बेलापूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर 16.02.2022 रोजी हजर करण्यात आले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
(हेही वाचा लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित सैन्याधिकारी, देशसेवेबाबत त्यांचा अभिमान! प्रसाद लाड यांची भूमिका)
पाच महिन्यांत 625 हून अधिक कर चुकवेगिरीचे गुन्हे
हे प्रकरण सीजीएसटी मुंबई विभागाने फसवणूक करणार्या आणि कर चुकवणार्यांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग आहे, जे नियमांचे पालन करणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी स्पर्धा निर्माण करतात आणि सरकारी तिजोरीची फसवणूक करतात. या मोहिमेचा एक भाग म्हणून नवी मुंबई आयुक्तालयाने अलिकडेच सुमारे 500 कोटी रुपयांची करचोरी शोधून काढली, 20 कोटी रुपये जप्त केले आणि 13 जणांना अटक केली. सीजीएसटी विभाग कर चुकवणार्यांची ओळख पटवण्यासाठी डेटा विश्लेषण साधनांचा वापर करत आहे. डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण वापरून, सीजीएसटी मुंबई विभागाच्या अधिकार्यांनी गेल्या पाच महिन्यांत 625 हून अधिक कर चुकवेगिरीचे गुन्हे नोंदवले असून 5500 कोटी रुपयांची कर चुकवेगिरी शोधून काढली आहे, तर 630 कोटी रुपये वसूल केले असून 50हून अधिक लोकांना अटक केली आहे. फसवणूक आणि करचोरी करून सरकारला फसवणाऱ्यांविरोधात सीजीएसटी विभाग मोहीम अधिक तीव्र करणार आहे.
Join Our WhatsApp Community