शिवसेनेचे नेते सुधीर जोशी यांचे निधन

141

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्यावर मागील महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शिवसेनेच्या स्थापनेपासून जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत स्वत: जोशी सेनेत कार्यरत होते. सेनेतील एक उच्च शिक्षीत आणि सोज्वळ चेहरा होता. वयाच्या 81 व्या वर्षी राहत्या घरी त्यांचे निधन झाले.

बाळासाहेब ठाकरेंच्या अत्यंत जवळचे

सुधीर जोशी यांना जानेवारीमध्येच कोरोनाची बाधा झाल्यामुळे मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले. त्यानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली. सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. शिवसेना पक्ष संघटनेत त्यांची महत्वाची भूमिका राहिली. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर माधव देशपांडे, शाम देशमुख, बळवंत मंत्री हे प्रमुख नेते बाळासाहेबांशी जोडले गेले. पुढे मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या दोघांनी शिवसेना वाढवण्यासाठी बाळासाहेबांसोबत मोठे काम केले. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत शिवसेना नेते म्हणून त्यांनी काम केले. 1972 मध्ये ते मुंबईचे महापौर झाले. पुढे पदवीधर मतदारसंघाचे पहिले आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि युतीच्या काळात शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

(हेही वाचा लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित सैन्याधिकारी, देशसेवेबाबत त्यांचा अभिमान! प्रसाद लाड यांची भूमिका)

‘संस्कृत व सुशिक्षित कार्यकर्त्यांचे मोहोळ लाभलेला’ आणि लोभस व्यक्तिमत्त्व असलेला, एकमेव शिवसेना नेता म्हणजे सुधीरभाऊ जोशी होय. मुंबईचे माजी महापौर तरुण व तडफदार सुधीर जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा मा. बाळासाहेबांनी सोपविली, ती त्यांनी समर्थपणे सांभाळली आणि मा. बाळासाहेबांनी त्यांच्यावरील टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला. बाळासाहेबांच्या सहकारी नेत्यांतील एक विश्वासू सहकारी नेता म्हणून ते बाळासाहेबांचे जवळचे सहकारी राहिले आहेत.

  • सुधीर जोशी हे १९६८ साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले. १९७३ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते.
  • १९६८ पासून ते विधान परिषद सदस्य होते. १९९२-९३ या दरम्यान ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. तेव्हा त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची पाहणी करून त्यासंदर्भात अहवाल निष्कर्ष पुस्तिकेद्वारे शासनाकडे सादर केला. शिवशाही सरकारात ते जून १९९५ ते मे १९९६ या कालखंडात प्रथम महसूल मंत्री होते. नंतर १९९६ ते १९९९ पर्यंत शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय लोकाभिमुख ठरले आहेत.
  • स्वतःच्या नेतृत्वाचे उसने अवसान न आणता त्यांनी लोकाधिकार चळवळीला बळ दिले आणि या चळवळीने जे बळ धरले व यश प्राप्त केले, त्यात सुधीर जोशींचा सिंहाचा वाटा आहे. संगीत, क्रिकेट व समाजसेवा यांचा त्रिवेणी संगम सुधीरभाऊंच्या जीवनात पाहायला मिळतो. ते त्यांच्या ‘आपुलकी’ या मोठ्या गुणामुळे गुणीजनांत नि समाजात अतिशय आपलेसे झाले आहेत. त्यामुळेच स्थानीय लोकाधिकार समिती म्हणजेच सुधीर जोशी हे समीकरण पक्के झाले, वृद्धिंगत झाले.
  • सुधीर जोशींनी जे सामाजिक आणि राजकीय पद भूषविले त्याला न्याय दिला आहे.

त्यांनी भूषवलेली काही पदे अशी आहेत.

  • अध्यक्ष- शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष.
  • अध्यक्ष / विश्वस्त – साने गुरुजी विद्यालय, दादर सार्वजनिक वाचनालय. कार्यकारी समिती सदस्य – गरवारे क्लब. सल्लागार-जसलोक रुग्णालय कर्मचारी संघटना. विश्वस्त-जाणीव प्रतिष्ठान. विश्वस्त-शिवाई सेवा ट्रस्ट. अध्यक्ष-बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना.
  • अध्यक्ष – इंडियन ओव्हरसीज बँक कर्मचारी सेना.
  • अध्यक्ष-कॅनरा बँक कर्मचारी सेना.
  • अध्यक्ष-महाराष्ट्र दूध वितरक सेना.
  • अध्यक्ष-विमा कर्मचारी सेना.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.