गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मिडियावर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क)च्या मधोमध कॉंक्रिटचा रस्ता बनवत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामुळेच यापुढे मैदानाचे भवितव्य काय? खेडाळू प्रशिक्षण कुठे घेणार? कॉंक्रिटच्या रस्त्यामुळे उद्भणाऱ्या समस्या अशा विविध विषयांवर समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे. सध्या शिवाजी पार्कच्या मध्यभागी मातीचा उपसा करून खडी, दगड टाकण्यात आले आहेत. त्यामुळे खरंच शिवाजी पार्कच्या मध्यभागी कॉंक्रिटचा रस्ता बांधला जात आहे का, अशी चर्चा जोरदार सुरू झाली आहे.
महापालिकेने काय दिले स्पष्टीकरण?
काही दिवसांपासून सोशल मिडियावर शिवाजी पार्कच्या मधोमध कॉंक्रिटचा रस्ता बांधला जात असल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे, असे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले आहे. या दगड वा खडीवर मातीचा थर टाकण्यात येणार आहे. हा रस्ता मातीचा असून त्या खाली पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ग्रॅव्हल्स (gravels) टाकण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय मैदानांमध्ये अशा प्रकारची पाणी वाहून नेण्याची व्यवस्था आहे. अगदी त्याचप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या धर्तीवर संपूर्ण शिवाजी पार्कमध्ये जमिनीखाली perforated pipes चे जाळे टाकले आहे. पार्कात नव्याने ३६ विहिरी तयार करण्यात आल्या आहेत. या विहिरींचे पाणी गवतावर पाणी शिंपडण्यासाठी तसेच धूळ उडू नये यासाठी वापरण्यात येईल. यामुळे विहिरीतील पाणी तसेच पावसाचे पाणी निचरा होऊन विहिरींना पुनश्च मिळण्यास मदत होईल.
( हेही वाचा : झाडांवर बुरशी, कीड लागली असेल…तर ‘ही’ घ्या काळजी! )
रहिवाशांची कमिटी
या कामाचे आराखडे जी/ उत्तर कार्यालयात उपलब्ध असून नागरिक ते कधीही पाहू शकतात. सदर मैदानाच्या दैनंदिन देखभालीकरीता स्वतंत्र कंत्राटी संस्था नेमण्यात येणार असून त्याकरता स्थानिक रहिवाशांची कमिटी बनविण्यात येईल जी पालिकेला सहकार्य करेल, असे जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community