गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेतील वाद हे शिगेला पोहोचले आहेत. त्यात आता महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या कांग्रेसच्या नेत्यांनीही भाजपवर आरोप करायला सुरुवात केल्यानंतर भाजपनेही आता आरोपांचा हल्ला परतवून लावायला सुरुवात केली आहे.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओला भाजपने चोख प्रत्युत्तर दिले आहे. जामीनावर बाहेर असणा-यांना भेटणं हा गुन्हा असेल तर राहुल आणि सोनिया गांधींना भेटणा-या काँग्रेस नेत्यांना काय म्हणावं, असा खोचक सवाल भाजपने केला आहे.
(हेही वाचाः लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित सैन्याधिकारी, देशसेवेबाबत त्यांचा अभिमान! प्रसाद लाड यांची भूमिका )
सचिन सावंत यांचे ट्वीट
भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात मालेगाव बॉम्बस्फोटात संशयित असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी हस्तांदोलन केले. त्या घटनेचा व्हिडिओ काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोशल मीडियावर शेअर केला. ‘बहुत याराना लगता है’, असे म्हणत हा व्हिडिओ त्यांनी शेअर केला होता. त्याला आता भाजपने देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे.
बहुत याराना लगता है। 🤔 pic.twitter.com/yu5xvphKhn
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 17, 2022
(हेही वाचाः विक्रम संपथ यांच्याविरुद्ध डाव्यांचे षड्यंत्र…दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली दखल)
भाजपचे प्रत्युत्तर
सचिन सावंत यांची तोंडावर पडण्याची सवय जाणार नाही.कर्नल प्रसाद पुरोहित हे जामीनावर बाहेर असून ते सध्या भारतीय सैन्यात सेवेत आहेत. त्यामुळे जर जामीनावर बाहेर असणा-यांना भेटणं गुन्हा असेल, तर सोनिया आणि राहुल गांधी हे सुद्धा बेलवर आहेत. त्यांना भेटणा-या काँग्रेस नेत्यांना काय म्हणावं, असा सवाल भाजपने ट्वीटच्या माध्यमातून सचिन सावंत यांना केला आहे.
तोंडावर पडण्याची सवय @sachin_inc यांची जाणार नाही. कर्नल पुरोहित जामिनावर बाहेर आहेत व ते सध्या भारतीय सैन्यात सेवेत आहेत.
जर बेलवर बाहेर असणाऱ्यांना भेटणं गुन्हा असेल. तर सोनिया गांधी, @RahulGandhi हे सुद्धा बेलवर बाहेर आहेत. त्यांना भेटणाऱ्या काँग्रेस नेत्यांना काय म्हणावं? https://t.co/qRogNcXAkF
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 17, 2022
हिंदू दहशतवाद रुजवण्यासाठी खोटे गुन्हे
दरम्यान यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कर्नल प्रसाद पुरोहित हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा गुन्हा दाखल आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यांना अजून दोषी ठरवण्यात आले नाही. सध्या ते सैन्यात पुन्हा रुजू झाले आहेत. सैन्यामध्ये गुप्तहेर खात्यात पुन्हा आपली सेवा देत आहे. देशसेवेत स्वतःचे जीवन समर्पित करणारे सैन्य अधिकारी हे केव्हाही सन्माननीय असतात. त्यामुळे त्यांचा मला अभिमान आहे, असे प्रसाद लाड म्हणाले. मालेगाव बॉम्बस्फोटात हिंदू दहशतवाद ही संकल्पना रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते, जे आता समोर येत आहे, असेही प्रसाद लाड म्हणाले.
Join Our WhatsApp Community