महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक घोषणा केल्यानंतरही, अद्याप तयार झालेलं नाही. या शिवस्मारकाची घोषणा झाल्यापासूनच हे स्मारक चर्चेत राहिले आहे. हे स्मारक स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षाही उंच व्हावे, म्हणून या शिवस्मारकाची उंची 192 मीटरवरून 210 मीटर करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर ही उंची पुन्हा 2 मीटरने वाढवून अंतिमतः 212 मीटर करण्यात आली आहे. तरीही शिवस्मारक अद्याप का तयार झाले नाही, हे स्मारक हरवले कुठे असा सवाल आता शिवप्रेमी विचारत आहेत.
तरीही स्मारकाचा पत्ता नाही!
सरकारने शिवस्मारकाच्या अधिकृत घोषणेपासून हे स्मारक अनेक कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. मात्र स्मारकाचे काम कधीच सुरू झाले नाही. ऑक्टोबर 2018 मध्ये शिवस्मारकाच्या कामाची निविदा मंजूर झाली. हे काम एल अँड टी कंपनीला मिळाले. अरबी समुद्रातल्या ज्या खडकावर हे स्मारक उभे राहणार होते, त्या खडकावर प्राथमिक खोदाईचे काम सुरू झाले खरे पण एका सामाजिक संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने ते कामही थांबले. या स्मारकाच्या कामाची पाहणी करायला गेलेल्या पत्रकाराचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर दोन निवडणुकाही झाल्या. एवढ सगळे झाले, तरी स्मारक काही दिसेना शिवस्मारक गेले तरी कुठे, असा प्रश्न शिवप्रेमी विचारत आहेत.
23 वर्षांपासूनची मागणी
शिवस्मारकाचा मुद्दा 2014 सालानंतर विशेष चर्चेत आला. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या स्मारकाचं मुंबईत येऊन जलपूजन केलं आणि स्मारकाची चर्चा जोरदार वाढली. मात्र आजही राजकीय आरोप-प्रत्यारोप, कोर्ट-कचेऱ्या, तांत्रिक परवानग्या, स्थानिक कोळ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न हेच स्मारकाबाबतच्या चर्चेचे विषय अधिक ठरले. पण मुंबईत शिवस्मारक उभारलं जावं ही चर्चा 2004मध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सुरू केल्याचं अनेकांना वाटतं. कारण त्यांनी अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची तेव्हा घोषणा केली होती.
( हेही वाचा: आदित्य ठाकरेंवर मानसिक परिणाम झालाय, भाजपच्या आमदाराचा हल्लाबोल )
म्हणून रखडले काम
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सध्या शिवस्मारकाच्या कामात 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. तसंच शिवस्मारकाच्या सध्याच्या जागेच्या परवानगीवरून सुद्धा वाद उत्पन्न झाले आहेत. हे स्मारकाचे आताचे वाद असले, तरी शिवस्मारकाच्या खडकाजवळ किनाऱ्यावर वस्ती करून असलेला कोळी समाज आणि स्मारक झाल्यास पर्यावरणाला धोका होईल ही धारणा असलेल्या पर्यावरणवाद्यांनी पहिल्यापासूनच या प्रकल्पावर हरकती घेतल्या आहेत. स्मारकामुळे उपजीविका धोक्यात येईल, हा दावा कोळी समाजाचा आहे, तर दुर्मिळ सागरी जीव नष्ट होऊन पर्यावरणाची हानी होईल हा दावा पर्यावरणवाद्यांचा आहे.
‘असं’ असेल शिवस्मारक
शिवस्मारक मुंबईतील गिरगाव चौपाटीपासून 3.5 किलोमीटर, राजभवनापासून 1.5 किलोमीटर तर नरिमन पॉईंटपासून 5.1 किलोमीटर अंतरावर तयार होणार आहे. इथल्या एका खडकाळ भागावर 15.96 हेक्टर जागेत स्मारक उभारलं जाणार आहे. स्मारकात संग्रहालय, थिएटर, माहिती देणारी दालनं, उद्यान आणि शिवाजी महाराजांचा ब्राँझचा पुतळा यांसह अन्य अनेक गोष्टींचा समावेश आहे. स्मारकाच्या भूभागावर हेलीपॅडही बांधण्यात येणार असून गिरगाव चौपाटी आणि नरिमन पॉईंटला पर्यटकांसाठी जेट्टी उभारण्यात येणार आहे. दररोज 10,000 पर्यटक स्मारकाला भेट देतील, असा सरकारचा दावा आहे.