मनी लाॅंडरिंगच्या गुन्ह्यात ईडीने इक्बाल कासकर याला शुक्रवारी तळोजा तुरुंगातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. दुपारी त्याला पीएमएलए विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. इक्बाल कासकर हा दाऊद इब्राहिमचा भाऊ असून त्याने अंडरवर्ल्डच्या पैशातून संपत्ती उभी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. इक्बाल कासकरला ईडीने केलेल्या अटकेमुळे डी कंपनीला धक्का बसला आहे.
माहितीच्या आधारे कारवाई
ईडीने डी कंपनीवर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर, ईडीकडून दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकरच्या नागपाडा येथील घरासह १० ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. दरम्यान ईडीने छोटा शकील याचा मेव्हुणा सलीम फ्रुट याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन रात्री उशिरा त्याला सोडून देण्यात आले होते. छापेमारीत ईडीच्या हाती लागलेल्या पुराव्यात डी कंपनीने अंडरवर्ल्डच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या मिळवलेल्या पैशातून मोठ्या प्रमाणात संपत्ती उभी केली असल्याची माहिती हाती लागली.
( हेही वाचा: ‘पंतप्रधानांना’मिळत नव्हता जन्म दाखला! ‘हे’ होते कारण)
७ दिवसांची ईडी कोठडी
इक्बाल कासकर याचा बेकायदेशीर धंद्यात सहभाग असल्यामुळे तळोजा तुरुंगात असलेल्या इक्बाल कासकर याचा ताबा घेण्यासाठी ईडीने विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालयाच्या परवानगी नंतर ईडीने ठाणे न्यायालयात अर्ज करून इक्बालचा ताबा मागितला होता. ठाणे न्यायालयाने परवानगी देताच शुक्रवारी ईडीने इक्बाल कासकर याचा तळोजा तुरुंगातून ताबा घेऊन, मनी लाॅंडरिंगच्या गुन्हयात त्याला अटक केली आहे. दुपारी त्याला पीएमएलए विशेष न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. इक्बाल कासकर याला २०१७ मध्ये ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने एका खंडणीच्या गुन्हयात अटक केली होती. मागील ४ वर्षांपासून इक्बाल हा तळोजा तुरुंगात असून, त्याला खंडणीच्या गुन्हयात जामीन मिळालेला नाही.
Join Our WhatsApp Community