कोकणचे कॅलिफोर्निया व्हाया गोवा! काय आहे हा अनोखा उपक्रम?

166

महाराष्ट्राला जवळपास सातशे वीस किलोमीटर लांबीचा कोकण किनारपट्टीचा प्रदेश लाभला आहे. गेल्या दोन वर्षात कोकणातील पर्यटनात वाढ झालेली आहे. कोकणाला लाभलेले स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे कोकणच्या सौंदर्यात भर घालतात. याच कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या काही दिवसांत पर्यटकांना गोव्याप्रमाणेच बीच शॅक्सचा आनंद घेता येणार आहे.

गोव्यानंतर बीच शॅक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. समुद्रकिनारा आणि किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी, राज्याने अलीकडेच ‘बिच शॅक’ धोरणाला मंजुरी दिली आहे. बीच शॅक धोरणामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच या माध्यमातून कोकणात येणाऱ्या पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्यासोबतच रुचकर जेवणाचा आस्वाद घेता येईल.

( हेही वाचा : महागाईचा फटका! ‘या’ जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ )

गोव्यासारखा अनुभव कोकणात!

बीच शॅक्स ही संकल्पना गोवेकरांना नवखी नाही. लांबच लांब समुद्रकिनाऱ्यांना न्याहाळत विविध पदार्थांचा आस्वाद घेत समुद्री पर्यटनाचा आनंद घेणे हे आजवर गोव्यात अनुभवता येत असे. कित्येक जण केवळ गोव्याचे राहणीमान अनुभवण्यासाठी गोव्याला भेट देतात. परंतु हा अनुभव घेण्यासाठी आता पर्यटकांना गोव्याची वाट धरावी लागणार नाही. कारण कोकणातील काही प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर महाराष्ट्र सरकार बीच शॅक्स धोरण राबवणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर हे बीच शॅक्स आपल्याला पहाता येणार आहेत.

बीच शॅक्ससाठी निवडले हे समुद्रकिनारे

  • रायगड- वरसोली आणि दिवेआगर
  • रत्नागिरी- गुहागर आणि आरे वारे
  • सिंधुदुर्ग- कुणकेश्वर आणि तारकर्ली
  • पालघर- केळवा आणि बोर्डी

( हेही वाचा : मराठी भाषेविषयी भरभरून व्यक्त व्हा! काय आहे स्पर्धा? )

हे बीच शॅक्स सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत उघडे राहतील आणि या भागात सीसीटीव्ही लावणे अनिवार्य असेल. महाराष्ट्राला एक सुंदर किनारपट्टी लाभली आहे आणि याचा योग्य उपयोग करुन घेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे असे, महाराष्ट्र पर्यटन विभागाने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.