मुंबईत युती सरकारच्या काळामध्ये सुरु करण्यात आलेले झुणका भाकर केंद्र हे दहा वर्षांपूर्वी अन्नदाता आहार केंद्रांमध्ये रुपांतरीत करण्यात आले. परंतु अन्नदाता आहार केंद्र योजना सुरु झाल्यानंतरही त्यामध्ये केवळ ७० झुणका भाकर केंद्रच या योजनेमध्ये परावर्तीत झाली आहे. त्यामुळे आजही मुंबईमधील १८७ झुणका भाकर केंद्र ही अन्नदाता आहार केंद्रांमध्ये रुपांतर झालेली नसून ही केंद्र झुणका भाकर केंद्र म्हणूनच कार्यरत आहेत.
झुणका-भाकर केंद्र
मुंबईतील झुणका-भाकर केंद्र हे अन्नदाता आहार केंद्रामध्ये परावर्तीत करून बंद असलेले जास्तीत जास्त झुणका-भाकर केंद्र कसे सुरु करता येईल, याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात महापालिका अधिकारी यांची ऑनलाइन आढावा बैठक घेतली. बैठकीला सर्व परिमंडळ उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त तसेच वैद्यकीय अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते.
महापौरांनी दिले निर्देश
या बैठकीमध्ये मुंबईत एकूण २५७ झुणका-भाकर केंद्र असल्यची माहिती देण्यात आली. त्यापैकी एकूण ७० झुणका भाकर केंद्र अन्नदाता आहार केंद्रामध्ये परावर्तित झाली आहेत. या अन्नदाता आहार केंद्रापैंकी २८ केंद्र हे विविध कारणाने तोडण्यात आली आहेत, तर ०६ केंद्र हे बंद आहेत. या सर्व केंद्र संचालकांची कागदपत्रे तपासून वारसाहक्काने त्यांना कसे देता येईल याची पडताळणी करण्याचे निर्देश दिले. त्यासोबतच जागेची अडचण असल्यामुळे महापालिकेच्या जागेव्यतिरिक्त राज्य शासनाची जागा उपलब्ध होऊ शकेल का ? याचा अहवाल येत्या गुरुवारपर्यंत सर्व संबंधित सहाय्यक आयुक्तांनी अतिरिक्त महापालिका आयुक्तांना सादर करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.
( हेही वाचा : शिवसेना-काँग्रेसमध्ये पडली ठिणगी ‘हे’ आहे कारण! )
या बैठकीमध्ये संपूर्ण विषयाबाबत तांत्रिक बाजू तपासून संपूर्ण अहवाल सादर केला जाईल, अशाप्रकारचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिले.
Join Our WhatsApp Community