मुंबईचा कोट्यधीश पोलिस कॉन्स्टेबल

ही सर्व रक्कम मित्राची असल्याची माहिती त्याने दिली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

102

दरमहा ५० ते ५५ हजार रुपये पगार घेणाऱ्या मुंबई पोलिस दलाच्या एका पोलिस कॉन्स्टेबलच्या खात्यावर कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी उलाढाल आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिस दलाच्या सशस्त्र विभागातील या पोलिस कॉन्स्टेबलसह त्याच्या पत्नीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू करण्यात आला आहे.

कोण आहे सुरेश बामणे?

सुरेश बामणे असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव असून, लता बामणे त्याच्या पत्नीचे नाव आहे. ९५च्या बॅचचा पोलिस शिपाई म्हणून मुंबई पोलिस दलात भरती झालेला सुरेश बामणे हा सध्या पोलिस नाईक या पदावर मुंबई नायगाव येथील सशस्त्र विभागात कार्यरत आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या एका दिवंगत चकमक फेम अधिकाऱ्यांच्या युनिटमध्ये तसेच दहशतवाद विरोधी पथकात देखील सुरेश बामणे हा कार्यरत होता.

(हेही वाचाः इर्षेपोटी १६ वर्षाच्या तरुणीने केलेले कृत्य वाचून हैराण व्हाल)

१२ कोटींची बेहोशिबी उलाढाल

मुंबईत गॅंगवॉरच्या वेळी सुरेश बामणे हा गुन्हे शाखेत कार्यरत असताना, त्याचे सर्वांशी चांगले संबंध होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरेश बामणे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात आलेल्या तक्रारीवरुन त्याची खुली चौकशी सुरू होती. या चौकशीत बामणे याच्या बँक खात्यावर मोठ्या रकमेची उलाढाल झाल्याचे समोर आले. त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या खात्यावर मिळून सुमारे १२ कोटी ६५ लाख ६३ हजार रुपयांची बेहिशोबी उलाढाल आढळून आली आहे. त्याच्याकडे याबाबत चौकशी केली असता, पत्नी झोपड्पट्टी पुनर्वसन योजना हे प्रोजेक्ट राबवत असल्याचे त्याने चौकशीत सांगितले. तर कधी ही सर्व रक्कम मित्राची असल्याची माहिती त्याने दिली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

गुन्हा दाखल

सुरेश बामणे याने पोलिस खात्यात असताना आपल्या पदाचा वापर करुन उत्पन्नापेक्षा भ्रष्ट मार्गाने अधिक अपसंपदा संपादित केली. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस नाईक सुरेश बामणे आणि पत्नी लता बामणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप अटक करण्यात आलेली नसून, अधिक तपास सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश बामणे हे वडाळ्यातील दोस्ती एकर्स या ठिकाणी राहत आहेत. सायन कोळीवाडा या ठिकाणी त्यांचा एक एसआरए प्रोजेक्ट सुरू असून, त्यात पत्नी संचालक असल्याचे म्हटले आहे. बामणे यांनी राज्यात अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

(हेही वाचाः इक्बाल कासकर तळोजा तुरुंगातून थेट ईडीच्या कोठडीत)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.