“नागपूरच्या फे-या वाढवणार”, या विधानामागे राऊतांंनी दिला इशारा!

155

शिवसेना खासदार संजय राऊत हे नागपूर दौ-यावर आहेत. या दौ-या दरम्यान त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं की, मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे नागपूरला येता आले नाही. पण,  मात्र आता हळूहळू माझ्या नागपूरच्या फेर्‍या वाढतील, असं राऊतांनी म्हटलं. त्यांच्या या विधानामागे राऊतांचा नेमका कोणाकडे इशारा आहे, याची सध्या चर्चा सुरु झाली आहे.

काॅंग्रेसशिवाय आघाडी नाही

राऊतांनी काँग्रेससोबत आघाडीसंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. राऊतांनी काँग्रेसशिवाय आघाडी बनवायची असं कधीच म्हणालो नाही,काँग्रेससोबतच नवी आघाडी बनली पाहिजे, असं म्हटलं आहे. रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील भेटीनंतर देशात भाजपविरोधी आघाडीबाबत मोठी चर्चा सुरु आहे.याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, आघाडी वगैरे हे शब्द बदला. या देशांमध्ये तिसरी आघाडी, चौथी आघाडी, पाचवी आघाडी हे प्रयोग कधीच यशस्वी झाल्याचे दिसले नाही. निवडणुका आल्या की, आघाडीची चर्चा सुरू होते काल तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर साडेचार तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. अनेक विषयांवर चर्चा केली. देशाचे राजकारण यावर सविस्तर चर्चा झाली. अनेक विषयांवर सहमतीही झाली आहे. भविष्यातल्या राजकीय दिशा काय असावी यावरही चर्चा झाली. भविष्यात या दोन नेत्यांशिवाय इतर अनेक पक्षाचे नेते एकत्रित भेटणार आहे. आम्ही हे कधीच म्हणालो नाही की काँग्रेसशिवाय आघाडी बनवायची आहे. जेव्हा ममता बॅनर्जींनी असे सूतोवाच केले होते, तेव्हा शिवसेना पहिला पक्ष होता ज्याने काँग्रेससोबतच नवी आघाडी बनली पाहिजे, असं मत व्यक्त केलं होतं, असं राऊतांनी म्हटलं आहे.

शिवसेनेची भाषा वेगळी

यावेळी राऊतांनी सोमय्यांसाठी वारंवार वापरल्या जाणा-या शिवराळ भाषेविषयी स्पष्टीकरण दिले. राऊत म्हणाले, जे महाराष्ट्रद्रोही आहेत आणि जे भ्रष्टाचारी आहेत, ज्याच्याविषयी महाराष्ट्र मनामध्ये कायम द्वेश आहे, अशा लोकांना जी भाषा समजते, त्या भाषेतचं बोलावं, असं आमच्या साधू संतांनी सांगितलं आहे. हजारो मारावे एक उरावा अशा पध्दतीचं राजकारण काही भाजपचे नेते करीत आहेत. मागील अनेक दिवसांपासून भाजपाचे नेते किरीट सोमय्या संजय राऊत यांच्यावरती भ्रष्टाचार केल्याचे आरोप करीत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे, त्यावर संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली. मागच्या काही दिवसांपासून राजकारणाचा स्तर घसरल्याचे, पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राला एक पंरपरा आहे पण शिवसेनेची एक वेगळी भाषा आहे असंही त्यांनी सांगितलं.

( हेही वाचा :कर्तव्याची वचनपूर्ती! पर्यावरणपुरक अद्ययावत मोहन रावले उद्यानाचे लोकार्पण! )

नागपूर बदललं आहे

राऊत म्हणाले की, रविवारी पोलीस आयुक्तांना भेटलो सदिच्छा भेट होती ते मुंबईलाही अधिकारी राहिलेले आहे म्हणून नागपुरात आल्यावर त्यांना भेटलो. माहिती काढण्यासाठी मला कुठल्याही अधिकाऱ्याला भेटायची गरज नाही. त्यांच्याबद्दल सर्व काही आहे आणि त्यांच्या संदर्भात लवकरच बोलेन. शक्यतो नागपूरला येऊनच बोलेन. नागपूर नक्कीच आता बदललेला आहे. कोरोनामुळे नागपुरात येऊ शकलो नाही, मात्र आता हळूहळू माझ्या नागपूरच्या फेर्‍या वाढतील, असं राऊतांनी म्हटलं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.