“… हे राजकारण देशाला परवडणार नाही; राज्य आणि देश खड्ड्यात जाईल”

162

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारच्या मुंबई भेटीत भाजपला राष्ट्रीय स्तरावर सक्षम पर्याय देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. देशात भाजपला हटवून परिवर्तन आणण्यावर आणि त्यासाठी प्रयत्न करण्यावर दोघांमध्ये सहमती झाली. यावेळी दोघांनीही केंद्र सरकारच्या कारभारावर निशाणा साधला. देशात राज्याराज्यांमध्ये चांगले वातावरण राहिले पाहिजे, असे मत व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकजण आपआपला हेतू ठेवून पुढे चालला तर राज्य आणि देश खड्ड्यात जाईल, असा इशारा दिला. तसेच हे राजकारण देशाला परवडणार नाही, असेही उद्धव ठाकरेंनी मुंबईतील पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

संपूर्ण देशात राज्य एकमेकांचा शेजारधर्म विसरले आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणाला १००० किलोमीटरची एकत्रित सीमारेषा असल्याचा उल्लेख झाला. आम्ही सख्खे शेजारी आहोत. देशात राज्याराज्यांमध्ये चांगलं वातावरण राहिलं पाहिजे. नाहीतर प्रत्येकजण आपआपला हेतू ठेऊन पुढे चालेल आणि राज्य गेलं खड्ड्यात, देश गेला खड्ड्यात अशी परिस्थिती निर्माण होईल. हे राजकारण देशाला परवडणारं नाही. असेही पुढे उद्धव ठाकरे म्हणाले. तर यानंतर राव हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही भेटले आणि आपल्या मोहिमेला पवार यांनी आशीर्वाद दिल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. देशातील परिवर्तनाचा रस्ता नेहमीच महाराष्ट्रातून जातो, असे सांगत राव यांनी भाजपविरोधी शक्तींना एकत्र आणण्याचे संकते दिले.

(हेही वाचा – “राणे हे शिवसेनेचं प्रॉडक्ट, स्टंटबाजी, नौटंकी करणं हा राणेंचा जुना धंदा”)

सुडाचे राजकारण हे आमचे हिंदुत्व नाही

देशात राजकारण गढूळ होत चालले आहे. राज्यकारभार दूर राहिला, पण सुडाचे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर सुरू झाले आहे. ही देशाची परंपरा नाही आणि हे आमचे हिंदुत्व नाहीच नाही. दुसऱ्याला बदनाम करण्याचा हा कारभार मोडायला पाहिजे. त्यासाठी एक चांगली दिशा आम्ही ठरवली असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.