देशात हिजाब प्रकरणी चांगलंच वातावरण तापलं आहे. अशातच बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील शिमोगामध्ये रविवारी रात्री हा प्रकार घडला. हर्षा असे हत्या झालेल्या 26 वर्षीय कार्यकर्त्याचे नाव असून त्याच्यावर चाकूने वार करुन हल्ला करण्यात आला आहे. आता या धक्कादायक प्रकारानंतर, कर्नाटकातील वातावरण तापले असून, शिवमोगा परिसरात तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. ही तणावपूर्ण स्थिती पाहता शिवमोगा परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, परिसरातील शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
म्हणून शाळा काॅलेज बंद
प्राथमिक तपासात या हत्येचा हिजाब वादाशीही संबंध जोडला जात आहे. तपासादरम्यान असं आढळून आलं आहे की, हर्षनं नुकतीच त्याच्या फेसबुक प्रोफाइलवर हिजाबविरोधात आणि भगव्या शालीच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली होती. या घटनेसंदर्भात कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र म्हणाले की, “4-5 तरुणांच्या टोळक्यानं 26 वर्षीय तरुणाची हत्या केली. या हत्येमागे कोणती संघटना आहे, हे मला माहीत नाही. सध्या शिवमोगा येथे कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शहरांतील सर्व शाळा, महाविद्यालयं दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहेत.”
पोस्ट व्हायरल
कर्नाटकातील उडुपीपासून सुरू झालेला हिजाबचा वाद आता देशभर पसरला आहे. सोशल मीडियापासून रस्त्यांपर्यंत अनेक बड्या नेत्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत या वादावर आपलं मत व्यक्त करत आहेत. दुसरीकडे, हिजाबच्या वादाला सुरुवात झाल्यानंतर, बजरंग दलदेखील या प्रकरणात सक्रिय झाला आणि सोशल मीडियासह सर्वत्र शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब न परिधान करण्याचं समर्थन करत आहे. अशा परिस्थितीत हर्षनं लिहिलेली पोस्ट आणि ही घटना एकमेकांशी जोडली जात आहे. मात्र, पोलीस याबाबत काहीही बोलण्याचं टाळत आहेत.
( हेही वाचा: बापरे! कोरोनाच्या ५० हजार लसी जाणार वाया…पण का? )