शिवजयंतीनिमित्त बाईक रॅली काढणं पडलं महागात! आमदारासह ३५ जणांवर गुन्हा

93

शिवजयंतीनिमित्त चिखली शहरातून विनापरवाना काढलेल्या दुचाकी रॅलीमुळे नियमांचे उल्लंघन झाले. या कारणास्तव भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांच्यासह सुमारे ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर शहरात प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

रॅलीत सहभागी झालेल्या महिलांवर गुन्हे

१९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त चिखली शहरातून आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात महिलांची दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये अनेक महिला लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मात्र कोरोना प्रतिबंधक नियमांनुसार रॅलीला परवानगी नसल्याचे सांगत नियम भंग झाल्याचे कारण देत रॅलीत सहभागी झालेल्या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

(हेही वाचा -कोण पुरवतंय डी-कंपनीला आर्थिक रसद? ईडीकडून तपास सुरू)

शासनाच्या कोविड नियमाचे उल्लंघन

विनापरवाना दुचाकी रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे आणि महाराष्ट्र शासनाचे कोविड नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप संबंधितांवर पोलिसांनी लावला आहे. यामध्ये आमदार श्वेता महाले, जिल्हा परिषद सदस्या डॉ. ज्योती खेडेकर, माजी नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, माजी नगरसेविका संगिता गाडेकर, मीनल गावंडे, नेहा खरात, किरण गाडेकर, विजया खडसन, सुरेखा पडघान, मनीषा सपकाळ, अनिकेत सावजी, अमोल खेडेकर आदी ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलिसांनी या सर्वांवर भादंवि कलम १८८, २६९, २७० यासह कलम ३ साथरोग प्रतिबंधक अधिनियम, १३५ अंतर्गत ही कारवाई केली आहे. या पोलीस कारवाईचा शहरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या विरोधात महिला आक्रमक होत शहरातील मुख्य शिवाजी चौकात पोलिसांविरोधात ठिय्या आंदोलन केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.