बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल चे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून त्यांना दोषी ठरवण्यात आले असून त्यांना 5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
38 जणांना शिक्षा
चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यासह एकूण 38 जणांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.के. शशी यांनी हा निकाल दिला आहे. 5 वर्ष कोठडी आणि 60 लाख रुपयांचा दंड लालू यादव यांना ठोठावण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी आता लालू यादव उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे.
…तर तुरुंगात राहवे लागणार
शिक्षा सुनावण्यात आलेले 38 पैकी 35 दोषी हे बिरसा मुंडा तुरुंगात कैद आहेत. तर लालू यादव यांच्यासह तिघे जण हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थान येथे उपचार घेत आहेत. लालूंच्या जामिनासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण जामिन न मिळाल्यास त्यांना तुरुंगात रहावे लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
काय आहे प्रकरण?
1996 साली डोरंडा कोषागार मधून 139.35 करोड रुपयांचा चारा घोटाळा करण्यात आला होता. त्यावेळी लालू यादव हे बिहारचे मुख्यमंत्री होते. या आरोपांमुळे त्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता.
Join Our WhatsApp Community