बेस्ट उपक्रमाने एक फलक लावत प्रतिक्षा नगर आगारामधील सर्व वाहक-चालकांची बदली आणिक आगारात झालेली आहे, अशी माहिती कर्मचाऱ्यांना दिली. प्रतिक्षा नगर आगारातील केवळ लॉकर वापरावे, हजेरी मात्र आणिक आगारात लावली जाईल, अशा आशयाचा फलक लावण्यात आला होता. याविरोधात आता बेस्ट कर्मचारी वर्ग चांगलाच आक्रमक झाला आहे. तात्काळ या बदल्या रद्द करून कामकाज पूर्वस्थितीत सुरू करावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा कर्मचारी वर्गाच्या वतीने सरचिटणीस ज.म.कहार यांनी बेस्ट उपक्रमाला दिला आहे. याविषयी त्यांनी निवेदन जारी केले आहे.
( हेही वाचा : संपाचा परिणाम! खासगी चालकांमुळे होत आहेत एसटीचे अपघात? )
बेस्ट उपक्रमाला निवेदन
११ फेब्रुवारीला बेस्ट उपक्रमाने प्रतिक्षानगर आगारातील सर्व वाहक चालक कर्मचाऱ्यांच्या आणि परिवहन अभियांत्रिकी विभागातील ७६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या इतरत्र केल्या आणि कंत्राटदाराच्या मालकीच्या वेटलीज बेसिसवरील बसगाड्यांचे दुरुस्ती व देखभालीचे कामकाज करण्यासाठी ३२ कर्मचाऱ्यांना सदर प्रतिक्षानगर आगारात थांबविण्यात आले आहे. तसेच प्रतीक्षानगर आगारातील जागा मेसर्स मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्याकडून चालविण्यात येत असलेल्या बसगाड्या उभ्या करण्यासाठी आणि सदर बसगाड्यांची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी प्रतिबस रु. १ प्रमाणे वार्षिक भाडे स्वीकारून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हे बेकायदेशीर असून, कंत्राटदारांना बेस्ट उपक्रमाच्या जागेतूनच उद्योग चालविण्यास आमंत्रित केले आहे. असा आरोप कर्मचारी वर्गाने निवेदनामार्फत केला आहे.
बेस्ट उपक्रमाच्या परिवहन उद्योगातील वाहतूक व परिवहन अभियांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांच्या कुटील हेतूने बदल्या करून, प्रतीक्षानगर येथील बेस्ट उपक्रमाचे कामकाज बेकायदेशीररित्या बंद करण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाची कोणतीही पूर्व परवानगी घेतलेली नाही. बेस्ट प्रशासनाने प्रतीक्षानगर आगार येथील वाहतूक व परिवहन अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांना इतरत्र बदली करून, टाळेबंदीची परिस्थिती निर्माण करण्यापूर्वी महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९७१ प्रमाणे कर्मचाऱ्यांना टाळेबंदीची लेखी नोटीस देणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी अशी कोणतीही सूचना कर्मचाऱ्यांना दिलेली नाही. असेही या निवेदनात स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : भराडी देवीच्या जत्रेक जातास, मगे ही बातमी वाचा… )
आंदोलनाचा इशारा
हा बदल्यांचा निर्णय तात्काळ रद्द करून कामकाज पूर्वस्थितीत सुरू करा अशी विनंती कहार यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे. अन्यथा कर्मचारी वर्ग, युनियन सक्षम न्यायिक प्राधिकरणाकडे दाद मागेल तसेच, कर्मचारी वर्गाच्या असंतोषाची परिणती तीव्र आंदोलनात होऊन शांततेचा भंग झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी बेस्ट प्रशासनाची असेल असेही या निवेदनात स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community