“फसवणूक, लबाडी कोण करतंय, याचं उत्तर राऊतांनी द्यावं”

रश्मी ठाकरे यांच्या कोर्लई येथील जमीन खरेदीचे पुरावे सोमय्या यांच्याकडून सादर

152

रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जमीन खरेदीचे पुरावे भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत सादर केले. जमीन खरेदीची ही कागदपत्रे व रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीला पाठवलेली पत्रे बघितल्यावर फसवणूक, लबाडी कोण करते आहे याचे उत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी द्यावे, असे आव्हान सोमय्या यांनी दिले.

काय म्हणाले सोमय्या

सोमय्या म्हणाले की, कोर्लई गावात रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी मे २०१४ मध्ये जमीन खरेदी केली. २३ मे २०१९ रोजी रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जमिनीची कर आकारणी आपल्या नावाने करावी अशी ग्रामपंचायतीला विनंती करणारे पत्र सादर केले. तसेच २ फेब्रुवारी २०२१ रोजी रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी ग्रामपंचायतीला पत्र पाठवून या जमिनीवर आकारलेला मालमत्ता कर अवास्तव असल्याने तो कमी करावा अशी विनंती केल्याचे पत्रच सोमय्या यांनी पत्रकारांसमोर सादर केले.

(हेही वाचा – माणसाचं मुंडकं उडवणारा ‘तो’ वाघ पकडला)

…यावरून फसवणूक कोण करतंय हे स्पष्ट 

२ फेब्रुवारी २०२१ रोजी पाठवलेल्या या पत्रात रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम नव्हते असा उल्लेख केल्याचेही सोमय्या यांनी निदर्शनास आणून दिले. ही कागदपत्रे पाहिल्यावर फसवणूक कोण करते आहे हे स्पष्ट होते आहे , असे सोमय्या म्हणाले. आपल्याविषयी असभ्य शब्दांचा वापर करणाऱ्या संजय राऊत यांना या शब्दांचा अर्थ तरी माहीत आहे का, असा सवाल सोमय्या यांनी केला. २०१९ मध्ये रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी पाठवलेल्या पत्रानुसार अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेली जमीन रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांच्या नावाने करण्यास मंजुरी दिल्याबाबतचे कोर्लई ग्रामपंचायत सभेचे इतिवृत्त सोमय्या यांनी सादर केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेश कार्यालय सह प्रभारी सुमंत घैसास उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.