मलबारहिलमधील कमला नेहरु गार्डन, हँगिंग गार्डनमध्ये ट्री वॉक उभारण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आल्यानंतर आता वांद्रे किल्ल्याजवळील उद्यानांमध्ये ट्री हाऊस उभारले जाणार आहे. या ट्री हाऊससाठी तब्बल १ कोटी ६ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांनी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची हमी दिली असून त्यानुसार महापालिकेच्या निधीतून हे काम केले जाणार आहे.
ट्री हाऊसकरता १ कोटी रुपयांचा निधी मंजूर
मुंबईतील विविध ठिकाणी मुंबईच्या सौंदर्यात अधिकाधिक भर पाडण्यासाठी महापालिकेसोबत जिल्हाधिकारी यांनीही पुढाकार घेतला आहे. त्यामुळे वांद्रे किल्ल्या जवळील उद्यानात ट्री हाऊस बांधण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या ट्री हाऊसचे बांधकाम महापालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून पार पाडले जाणार असून यासाठी लागणारा निधी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. याकरता यासाठीचा १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून तो महापालिकेला देण्याच्या अटीवर महापालिकेच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. याबाबत उपनगराच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी एक कोटी रुपयांचा निधी महापालिकेला देण्याची हमी देण्यात आल्यानंतर नियोजन विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी या ट्री हाऊसचे काम हाती घेण्यासाठी निविदा मागवली.
(हेही वाचा -“फसवणूक, लबाडी कोण करतंय, याचं उत्तर राऊतांनी द्यावं”)
ट्री हाऊसच्या निविदेत ही कंपनी ठरली पात्र
या ट्री हाऊसच्या निविदेमध्ये व्हर्गो स्पेशालिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली असून महापालिकेच्या अंदाजापेक्षा सुमारे ६ ते ७ टक्के अधिक बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. या कामासाठी विविध करांसह १ कोटी ६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित संस्था ही ट्री हाऊसचा आराखडा बनवणे फॅब्रिकेशन, कलात्मक बांधकाम करणार असून यामध्ये माती विश्लेषणासह जमिनीचे मुल्यांकन आणि जमिनीच्या स्थितीची प्रारंभिक तपासणी, सभोवतालच्या वृक्षांच्या ट्री हाऊस बांधण्यास अनुकूल आहेत किंवा कसे याबाबत संशोधन करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑगस्ट २०२१ रोजी महापालिकेच्या नियोजन विभागाला निर्देश दिले होते, त्यानुसार नियोजन विभागाने हे काम हाती घेतले आहे.