मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयतील खजिना पूर्णपणे खराब झाला असून या ग्रंथालयाची दुर्दशा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या साठ-सत्तर वर्षांपासून जपलेल्या दुर्मिळ पुस्तकांचा विद्यापीठाच्या ग्रंथालयतील हजारो पुस्तकांचा खजिना आता रद्दीत जमा होतोय. तर काही पुस्तकांना वाळवी लागली असल्याचे सांगितले जात असून अनेक पुस्तकं रद्दीत जमा करण्याच्या वेळ आली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाला ग्रंथसंपदेचं मोल नाही का? असा सवाल आता उपस्थितीत केला जात आहे.
अनागोंदी कारभारामुळे पुस्तकांना वाळवी
मुंबई विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाची इमारत ही १९७५ ला तयार करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात संदर्भ ग्रंथ, पुस्तके, वर्तमानपत्रे यांची मिळून तब्बल ७.८०.००० एवढी ग्रंथसंपदा आहे. या ग्रंथालयात काही देणगीदारांनी त्यांच्याकडे जागा नसल्याने व त्यांच्या उपयोगाची नसलेली अनेक ग्रंथ, वर्तमानपत्रे देणगी म्हणून दिलेली होती. तसेच काही पुस्तके विक्री अभावीही मोठ्या प्रमाणात या ग्रंथालयात ठेवण्यात आली आहेत. मात्र मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कलिना संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयातील पुस्तके धूळ खात पडून आहेत. ग्रंथालयातील दुर्मीळ पुस्तके, विविध संदर्भ ग्रंथ, जुनी वर्तमानपत्रे, प्रबंध हे पोत्यामध्ये भरून सिमेंट, वाळूच्या ढिगाऱ्यात ठेवली आहेत. अनेक पुस्तकांना वाळवी लागली आहे.
(हेही वाचा – “फसवणूक, लबाडी कोण करतंय, याचं उत्तर राऊतांनी द्यावं”)
दुरावस्था पाहून पुस्तकांसाठी आंदोलनाची वेळ
यावर युवासेना सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी विद्यापीठात ग्रंथालयाची दुरावस्था पाहून पुस्तकांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचं सांगून याबाबत विद्यापीठ प्रशासनाला पत्र लिहून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले. विद्यापीठाकडून ग्रंथालयाच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. ग्रंथालयातील पुस्तके, संदर्भ ग्रंथ, वर्तमानपत्रे योग्य पद्धतीने सुरक्षितस्थळी स्थलांतरित करणे आवश्यक असताना विद्यापीठाने ही ग्रंथसंपदा पोत्यामध्ये भरून सिमेंट व वाळूचे ढिगारे ठेवलेल्या भागामध्ये ठेवली आहेत. अनेक पुस्तके धूळ खात आहे. प्राध्यापक, विद्यार्थ्यांकडून या ग्रंथसंपदेचा वापर केला जात असताना या ग्रंथसंपदेबाबत असंवेदनशील का असा प्रश्न सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना पत्र लिहून विचारला आहे.
Join Our WhatsApp Community