लवकरच कोकणातील ‘या’ जिल्ह्यात होणार नवं विमानतळ?

107

चिपी विमानतळ हे कोकणातील पहिले विमानतळ. प्रवासाला सोयीस्कर म्हणून कोकणात हक्काचे विमानतळ व्हावे अशी कोकणावासींयाची मागणी होती. चिपी विमानतळ हे सिंधुदुर्गात असल्यामुळे रत्नागिरीकरांना या विमानतळाचा विशेष फायदा होत नाही. त्यामुळेच रत्नागिरीतील दापोली तालुक्यात विमानतळ व्हावे अशी स्थानिकांची मागणी आहे. दापोली तालुक्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक वाढावेत, याकरिता विमानतळाची मागणी लाडघर बीच पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्थेने पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

( हेही वाचा : महापालिका शाळांमधील मुलांना मिळणार शुध्दपाणी? )

विमानतळासाठी दापोली तालुक्यातील जागा 

दापोली तालुक्यातील हर्णैजवळील २३५ एकर जागा विमानतळासाठी सुचविण्यात आली आहे. त्यामध्ये २१७ एकर जागा सपाट आणि शासकीय गायरान म्हणून उपलब्ध आहे. यापैकी पाच टक्के जागा नियमाप्रमाणे लागवडीसाठी सोडून उर्वरित जागेत विमानतळ करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. ही जागा रेवस-रेडी राष्ट्रीय महामार्गापासून केवळ १ किलोमीटर अंतरावर असल्याने विमानतळावरून येणे-जाणेदेखील सोयीचे होणार आहे.

विमानतळासाठी सुचविलेली जागा हर्णै-सुवर्णदुर्ग किल्ल्ल्यापासून तीन किलोमीटर तसेच श्रीवर्धन, गुहागर, खेड व मंडणगड तालुक्यातून केवळ ५० कि.मी.च्या आत असल्याने या सर्व तालुक्यांना या विमानतळाचा मोठा उपयोग होणार आहे. या जागेपासून रत्नागिरी विमानतळ १५० कि.मी. अंतरावर, नवी मुंबई विमानतळ २०० कि.मी. अंतरावर आहे. याचा विचार करून दापोली तालुक्यात विमानतळ उभारावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.