आज कशाची आवश्यकता आहे, पक्षनिष्ठा की राष्ट्रनिष्ठा?

138

पक्षनिष्ठा की राष्ट्रनिष्ठा या दोन निष्ठांमध्ये एकाची निवड करायची असेल, तर कशाची निवड करणार? हा प्रश्न आहे. राष्ट्राच्या रक्षणार्थ पक्षाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रनिष्ठेला बगल देऊन केवळ पक्षनिष्ठा जपणे राष्ट्रहिताचे ठरेल का? याचा प्रामाणिकपणाने सर्वांनी विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे.

एखादी व्यक्ती मोठी असते, कारण त्या व्यक्तीत श्रेष्ठ दर्जाचे गुण असतात. त्या व्यक्तीकडून सर्वसामान्य माणसांपेक्षा महान कार्य घडलेले असते. म्हणून ती व्यक्ती वंदनीय, आदरणीय आणि क्वचित प्रसंगी अनुकरणीय असते. तथापि एखादी व्यक्ती मोठी आहे म्हणून ती अनुकरणीय आहे, असे म्हणता येत नाही. वंदनीय आणि आदरणीय असणे हा भाग वेगळा आणि अनुकरणीय असणे हा भाग वेगळा. याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. एखादा नट अथवा नटी उत्तम अभिनय करतो किंवा करते. त्यासाठी अपार कष्ट घेतले, आपले शारीरिक स्वास्थ्य सुद्धा उत्तम राखले आहे. यात त्या नटावर किंवा नदीवर टीका करण्यासारखे काहीही नाही हे निश्चित. वय वाढलेले असताना सुद्धा उत्तम प्रकारे नृत्य करणारी एखादी नर्तिका कौतुकास्पद आहे, यात वाद नाही. म्हणून ती कला क्षेत्रापुरती एका मर्यादित स्वरूपात वंदनीय, आदरणीय आहे. अधिक व्यापकतेने विचार करताना कोणती व्यक्ती आदरणीय, वंदनीय आणि अनुकरणीय आहे याचा आपल्याला शोध घ्यावा लागेल. हा शोध घेताना आपल्यासमोर अशी एक महनीय व्यक्ती येते. त्या व्यक्तीची एक आठवण…

(हेही वाचा संपकरी एसटी कामगारांना ‘वसुली’ माफ!)

स्वातंत्र्यवीर सावरकर वृद्ध झाले होते. त्यांना सांगण्यात आले, ‘तात्या, तुमचे जुने पिस्तूल सापडले. ते सरकारकडे जमा करण्यात आले आहे.’ तात्या उसळून म्हणाले, ‘सरकारकडे ते कशासाठी जमा केले? सरकारला शास्त्राची घृणा आहे. शस्त्राचे महत्व सरकार जाणत नाही. अशा सरकारकडे माझे शस्त्र का दिले?’ तात्यांना उत्तर देण्यात आले, ‘तात्या, त्या पिस्तुलाचा काही उपयोग नाही. ते पार गंजून गेले आहे. म्हणून‌…’ सांगणाऱ्याचे वाक्य पूर्ण होण्याच्या आत भारत मातेचा वयोवृद्ध वीरपुत्र गर्जला, ‘अरे पिस्तूल गंजले आहे. माझे मनगट नाही.’ ज्याने आपले उभे आयुष्य राष्ट्राच्या उत्कर्षासाठी खर्ची घातले. कोणत्याही व्यक्तिगत सुखाचा ज्याने क्षणभरही विचार केला नाही, त्या व्यक्तीचा आदर्श आपण उरात जपला पाहिजे. आज याची आपल्या राष्ट्राला नितांत आवश्यकता आहे.

इस्रायलमध्ये राष्ट्रापेक्षा कोणताही नेता मोठा नाही

आपल्या देशात राजसत्तेवर राष्ट्रनिष्ठ, सुशिक्षित, सुविद्य, सत्यनिष्ठ, न्यायनिष्ठ, तत्त्वनिष्ठ, नीतिनिष्ठ जनतेचा अंकुश आहे का? याचा विचार करणे नितांत आवश्यक आहे. आपल्या देशाची जनता अशाप्रकारे निष्ठावान बनवण्यासाठी झटणाऱ्या शैक्षणिक संस्था, सार्वजनिक संस्था निर्माण होण्याची आज नितांत आवश्यकता आहे. कोणताही नेता राष्ट्रापेक्षा मोठा असू शकत नाही. याबाबतीत जगातल्या इस्रायल, स्वीडन सारख्या देशांनी एक आदर्श निर्माण केला आहे. इस्रायल देशातला मंत्री रेल्वेने प्रवास करतो. एखाद्या सर्वसामान्य सोसायटीत छोट्या फ्लॅटमध्ये राहतो. इस्रायल नागरिकाच्या दृष्टीने देशातला कोणताही नेता त्यांच्या राष्ट्रापेक्षा मोठा नाही.

…म्हणून स्वीडनमध्ये पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागला

स्वीडनमधील डेमोक्रेटिक पार्टीची पक्ष प्रमुख नेता असलेली मोना सलीन ही पंतप्रधानपदाची उमेदवार म्हणून घोषित करण्यात आली. तिच्याकडून एक चूक घडली. स्वीडनमधल्या मंत्र्यांकडे, खासदारांकडे दोन प्रकारची क्रेडिट कार्ड असतात. एक स्वतःचे असते. ते व्यक्तिगत खर्चासाठी वापरले जाते. दुसरे सरकारी क्रेडिट कार्ड असते. त्याचा उपयोग केवळ सरकारी कामांसाठीच करायचा असा कडक नियम आहे. या नियमाचे पालन घडले नाही, तर कितीही मोठा नेता असला तरी त्याची गय केली जात नाही. मोना सलीन डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख नेता पदावर आरूढ असलेल्या स्त्रीकडून व्यक्तिगत वस्तूंची खरेदी करताना नकळत केवळ सरकारी कामासाठी उपयोगात आणले जाणारे क्रेडिट कार्ड दुकानदाराला दिले गेले. दुकानदाराच्या हे लक्षात येताच त्याने तत्काळ पोलिसांना कळवले आणि मोना सलीनच्या विरोधात रीतसर तक्रार करण्यात आली. तत्काळ मोना सलीनने पक्षाच्या प्रमुख नेते पदाचा राजीनामा दिला. आपल्या नेत्याच्या विरोधात पोलीस तक्रार केली म्हणून तिच्या पक्षातल्या एकाही सदस्याने संबंधित दुकानदारावर दबाव आणला नाही. त्या दुकानाची मोडतोड केली नाही. दुकानदाराला मारले नाही. उलट मोना सलीनला पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा राजीनामा द्यावा लागला. साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी हे आपले ब्रीदवाक्य आहे. आपल्या देशात असे चित्र दिसत नाही. राजसत्तेवर राष्ट्रनिष्ठ, सुशिक्षित, सुविद्य, सदाचारी, सत्यनिष्ठ, न्यायनिष्ठ, तत्वनिष्ठ, नीतिनिष्ठ जनतेचा अंकुश असणे नितांत आवश्यक आहे. या गोष्टीचा आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे.

लेखक – दुर्गेश जयवंत परूळकर, व्याख्याते आणि लेखक.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.