मालाड येथील तपोवन भागांत मंदिरात मोर ठेवल्याची गुप्त माहिती मिळाल्याने ठाणे प्रादेशिक वनविभागाच्या मुंबई टीमने सोमवारी या मंदिराला भेट देत मोरांची सुटका केली. यावेळी भारतीय पोपट तसेच स्टार प्रजातीचे कासवही वनाधिका-यांना आढळून आले. या प्राण्यांना वनविभागाने ताब्यात घेतले असून, पुढील कार्यवाही सुरु असल्याची माहिती वनाधिका-यांनी दिली.
वन्यजीवांची मंदिर परिसरात हेळसांड
एका वन्यप्राणी संस्थेला मंदिरातील परिसरात मोर ठेवल्याची माहिती मिळाली. वन्यप्राणी संस्थेनेच याबाबतची माहिती वनविभागाला दिली. सोमवारी वनअधिकारी धडकताच त्यांना मोर, भारतीय प्रजातीचे पोपट आणि स्टार प्रजातीचे कासव आढळले. हे सर्व प्राणी सुस्थितीत होते. भक्तांनीच हे प्राणी मंदिरासाठी दिल्याची माहिती मंदिराच्या साधूंनी दिली. हे वन्यजीव पाळता येत नसल्याची कबुली त्यांनी दिली. मात्र वन्यजीवांची मंदिर परिसरात हेळसांड होत नव्हती. त्यांना पिंज-यात बांधून ठेवले नव्हते. त्यामुळे तातडीने वन्यजीव हस्तगत केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
25 हजार रुपये दंडापासून ते सात वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद
या मंदिरात दोन मोरांना मुक्त सोडण्यात आले होते. मात्र त्यांना नैसर्गिक खाद्याऐवजी कुरमुरे, चणे, फुटाणे दिले जात होते. या खाद्यपदार्थांची मंदिर प्रशासनाकडूनच विक्री केली जायची. भक्तांना हे खाणे विकत घेत मोरांना खायला देण्याची परवानगी दिली गेली होती. हे नैसर्गिक खाद्यपदार्थ नसल्याने वन्यजीवप्रेमींनी अशा पद्धतीने मंदिर प्रशासनाने सुरु केलेल्या व्यवसायाबाबत नाराजी व्यक्त केली. स्टार प्रजातीचे कासव भारतीय वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ अंतर्गत पहिल्या वर्गवारीत सुरक्षित आहे. या प्रजातीचे कासव पाळल्यास पंचवीस हजार रुपये दंडापासून ते सात वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. तर भारतीय पोपट आणि मोरालाही चौथ्या वर्गवारीत संरक्षित करण्यात आले आहे. दोन्ही प्राणी घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी पाळल्याचे आढळल्यास पंचवीस हजारापर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद वनविभाग आरोपींकडून करु शकते.
(हेही वाचा माणसाचं मुंडकं उडवणारा ‘तो’ वाघ पकडला!)
मंदिरातील आढळलेले अन्य प्राणी
मंदिरात परदेशातून आणलेले ससे आणि बदकही होते. परंतु त्यांना पाळण्यासाठी भारतीय वन्यजीव संवर्धन कायद्याची मर्यादा नसल्याने वनाधिका-यांनी मोर, पोपट आणि स्टार प्रजातीचे कासव ताब्यात घेतले. या सर्व प्राण्यांची शारिरीक तपासणी केली असून, त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे वनाधिका-यांनी सांगितले. यासह मंदिरात गाय आणि म्हशी हे पाळीव प्राणीही ठेवण्यात आले होते.
वन्यजीव आढळल्यास
वन्यजीव आढळल्यास त्याला सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शनासाठी तसेच स्वतःकडे पाळता येत नाही. वन्यजीवांसंदर्भात तक्रार किंवा माहिती घ्यायची असल्याल वनविभागाचा हेल्पलाईन क्रमांक १९२६वर संपर्क साधता येईल.
Join Our WhatsApp Community