महाराष्ट्रातील चौघांसह एकूण 11 खासदारांना यंदा ‘संसद रत्न अवार्ड 2022’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे प्राईम पॉईंट फाऊंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराच्या सातव्यांदा मानकरी ठरल्या आहेत. संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेल्या 11 खासदारांमध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे शिवसेनेचे श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीच्या फौजिया खान, भाजपच्या हीना गावित यांचाही समावेश आहे. हा 12 वा संसद रत्न पुरस्कार सोहळा आगामी 26 फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणार आहे.
(हेही वाचा – राज्यात लोकल प्रवासासहित इतर निर्बंध अद्याप कायम)
17 व्या लोकसभेतील कामगिरीबद्दल संसदरत्न बहाल
याशिवाय भाजपचे तमिळनाडूमधून खासदार असलेले एचवी हांडे आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते एम. वीरप्पा मोईली यांना लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. तसेच तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय (पश्चिम बंगाल), काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा (अंदमान आणि निकोबार बेटे), आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार विद्युत बरन महतो (झारखंड), हीना विजयकुमार गावित (महाराष्ट्र) आणि सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश) यांना या 17 व्या लोकसभेतील कामगिरीबद्दल संसदरत्न पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.
अशी करण्यात पुरस्कार विजेत्यांची निवड
यासंदर्भात प्राईम पॉइंट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष के श्रीनिवासन यांनी सांगितले की, खासदारांच्या कामगिरीच्या आधारेच त्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पीआरएस इंडियाने प्रदान केलेल्या डेटाचा आधार घेण्यात आला. सत्राव्या लोकसभेच्या सुरुवातीपासून ते हिवाळी अधिवेशन 2021 च्या शेवटपर्यंतच्या त्यांच्या एकत्रित कामगिरीच्या आधारे पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community