प्रतीक्षानगर पाठोपाठ आता ‘बेस्ट’चे सांताक्रूझ आगारसुद्धा होणार बंद?

249

बेस्ट उपक्रमाने फलक लावत प्रतिक्षा नगर आगारामधील सर्व वाहक-चालकांची बदली आणिक आगारात झालेली आहे, अशी माहिती कर्मचाऱ्यांना दिली. कंत्राटी बसगाडयांच्या देखभालीकरिता बेस्ट प्रशासनाने वर्षाकाठी प्रती बस फक्त १ रुपया या प्रमाणे संपूर्ण प्रतीक्षानगर आगार ‘मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंत्राटदाराला आंदण म्हणून बहाल केला, आणि आता बेस्ट उपक्रमाच्या सांताक्रूझ आगारात सुद्धा २२ फेब्रुवारीला खासगी कंत्राटदाराच्या बसगाड्यांचा ताफा दाखल झालेला आहे.

( हेही वाचा : केंद्राच्या निधीतून का नाकारल्या ‘बेस्ट’ने बस? हे आहे कारण… )

कर्मचारी वर्गात असंतोष

२२ फेब्रुवारीला ‘मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंत्राटदाराच्या बसगाड्यांचा ताफा सांताक्रूझ आगारात दाखल झाला. यामुळे कर्मचारी वर्गाच असंतोष निर्माण झाला आहे. प्रतीक्षानगर आगारापाठोपाठ अजून ३ आगार तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासन घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यात प्रामुख्याने, ओशिवरा, मालवणी, सांताक्रूझ या आगारांचा समावेश होऊ शकतो. बेस्ट प्रशासनाने आज या कंत्राटी बसगाड्या सांताक्रूझ आगारात दाखल केल्यानंतर आता प्रशासन सांताक्रूझ आगाराबाबत नक्की कोणती भूमिका घेते याकडे कर्मचारी वर्गाचे लक्ष आहे.

( हेही वाचा : पुन्हा गर्दी जमणार! रॅली, रोड शोवरील निर्बंध निवडणूक आयोगाने हटवले )

खाजगीकरणामुळे नोकरीबाबत प्रश्नचिन्ह

बेस्ट प्रशासनाच्या या तडकाफडकी निर्णयांमुळे बेस्ट कर्मचारी मात्र धास्तावलेले आहेत. याच त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात बेस्ट च्या धारावी आगारातील कर्मचारी प्रमोद आंधळे यांनी स्वतःच्या मुलासोबत, धावत्या रेल्वेगाडी पुढे स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. एकंदरीतच या अचानक लादलेल्या खाजगीकरणामुळे बेस्ट च्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांपुढे त्यांच्या नोकरीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता बेस्ट सांताक्रूझ आगाराला टाळे ठोकणार का? प्रतीक्षानगर आगाराप्रमाणेच सांताक्रूझ आगारात आलेल्या कंत्राटी बसगाड्यांचा ताफा हा सांताक्रूझ आगार बंद करण्याच्या कुटील कारस्थानाची नांदी तर नसेल? असा सवाल कामगारसेनेने उपस्थित केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.