आदित्य ठाकरेंची स्वप्नपूर्ती लाखोंतून कोटीत!

225

पवई तलावामध्ये यापूर्वी बसवलेले संगीत कारंजे गंजून गेल्याने आता या ठिकाणी तरंगते वायू विजन कारंजे बसवले जाणार आहेत. मात्र, ६३ लाखांचे हे काम चक्क दीड कोटींच्या घरात जाऊन पोहोचले. तलावातील पाण वेलींचे प्रमाण कमी करण्यासाठी कारंजे बसवण्यात येत आहेत. त्यामुळे या कारंज्यासाठी मंजूर केलेल्या कामाच्या तुलनेत अधिक खर्च असून कंत्राटदाराने तलावातील पाण्याच्या पातळीचे सर्वेक्षण केल्यानंतर या कामातील खर्चात वाढ दर्शवली आहे. त्यामुळे वाढलेल्या खर्चाचे कारंजातील पाण्याचे तुषार आता उंचच उंच वाढत मुंबईकरांना मोहित करून टाकणार आहेत.

… त्या ठिकाणी नवे कारंजे बसवणार

पवई तलाव हा १८९१ साली निर्माण करण्यांत आलेला कृत्रिम तलाव असून या तलावाची समुद्रसपाटीपासून उंची ५५ मिटर एवढी आहे. याचे पाणलोट क्षेत्र ६०० हेक्टर एवढे आहे. तलावाचे पाणी साठवण्याचे एकूण क्षेत्रफळ २२० हेक्टर एवढे आहे. सध्या पवई तलावात सांडपाण्याच्या विसर्गामुळे पाण्याची गुणवत्ता कमी होत आहे, तसेच तलावातील पाण्यात पान वनस्पतींची अमर्याद वाढ इत्यादी विपरीत परिणाम होऊन पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण कमी होत आहे. या सर्व कारणांमुळे तलावातील पाण्याची गुणवत्ता पुन्हा प्राप्त करून देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. यापूर्वी बसवण्यात आलेले कारंजे खराब झाल्यानंतर त्या ठिकाणी नव्याने कारंजे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, सन २०१६ मध्ये सल्लागारांची नियुक्ती करून तलावात झिरपणारे मलजल थांबविणे, मलजल प्रक्रिया केंद्र उभारणे, व इतर सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली. सल्लागारांच्या सल्ल्यानुसारच सन २०१९ मध्ये पवई तलावात एक तरंगती वायुविजन यंत्रणा उभारण्यात आली. पवई तलावातील विविध ठिकाणी मिळून २८ मीटर उंचीचा एक व १० मीटर उंचीचे सहा असे एकूण सात तरंगते वायुविजन कारंजे बसवून त्यांची देखभाल व चाचणीचे काम करण्याचा निर्णय प्रथम घेण्यात आला होता. परंतु जुलै २०२१ रोजी झालेल्या बैठकीत १० मीटर चे कारंजे (वायुविजन आणि सौंदर्याच्या दृष्टीने) तितके प्रभावी ठरणार नाहीत. त्यामुळे १० मीटर उंचीच्या कारंज्यांऐवजी सर्वच सात कारंजे २८ मीटर उंचीचे बसवण्यात यावेत. त्यानंतर या कामासाठी नेमण्यात आलेल्या क्लासिक फाऊंटन्स यांनी २८ मीटर उंचीचे सर्व सात कारंजे त्यांच्या निविदेतील २८ मीटर उंचीच्या कारंज्यांकरिता आकारलेल्या दराने देण्याचे मान्य केले आणि अतिरिक्त कामामुळे मूळ कामाच्या कंत्राट किमतीत फेरफार करावा लागला आहे.

१० मीटर कारंज्याच्या बचतीमधून पाच कारंजे

त्यातच सप्टेंबर २०२१ रोजी कंत्राटदाराने कारंजे बसवण्याच्या जागेचे सर्वेक्षण केले. त्यात पवई धरण, लार्सन अँड टुब्रो जवळील गणेश विसर्जन घाट यासारख्या ठिकाणी पाण्याची खोली १३-१५ फूट आहे तर निसर्ग उद्यान, पवारवाडी येथे मात्र ६-७ फूट इतकी पाण्याची खोली असल्याचे आढळून आले. पाण्याची खोली पावसाळ्यानंतर मोजली गेली आणि त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची पातळी आणखी कमी होईल अशी शक्यता वर्तवली गेली. त्यामुळे यासाठी पंप आणि त्याच्या ऍक्सेसरीज फिटिंगसाठी कमीतकमी ११-१२ फूट खोलीची गरज असल्याचे कंत्राटदाराने सांगितले. त्यामुळे प्रत्यक्ष स्थळातील अडचणी लक्षात घेऊन १० मीटर कारंज्याच्या बचतीमधून पाच कारंजे हे २८ मीटर उंचीचे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.

(हेही वाचा – “भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकलंय का?” राऊतांचा सवाल)

या नियोजित कामांपेक्षा दोन कारंजे अधिक बसवणे, ज्यामध्ये एक २८ मीटर व एक कारंजा ४२ मीटर उंचीचा बसवून यासाठी ३० एचपी क्षमतेचे पंप यामुळे जे कंत्राट काम पूर्वी ६३ लाख रुपयांचे होते, ते काम ३५ लाख १० हजारने वाढून ९९ लाख २ हजारांवर जावून पोहोचले. शिवाय यासाठी अतिदाबाची विद्युत वाहिनी अर्थात केबल्स टाकावी लागल्याने याचाही खर्च अतिरिक्त ४५ लाखांनी वाढला. त्यामुळे कारंजे बसवण्याचा एकूण खर्च ७९ लाखांनी वाढून १ कोटी ५५ लाख १२ हजारांच्या घरात जावून पोहोचला आहे.

सौंदर्य वाढवण्याबरोबरच पाण्याचे वायूविजन वाढवणार

जलअभियंता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पवई तलावाचे सौंदर्य वाढवण्याबरोबरच पाण्याचे वायूविजन वाढवण्याच्या दृष्टीकोनातून उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार हाती घेण्यात आले होते. तलावात मोठ्याप्रमाण निर्माण होणारी पाण वनस्पती आणि झिरपणारे पाणी यावर चर्चा करताना हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कारंजे बसवण्यासह पुढील दोन वर्षांची देखभाल व दुरुस्ती तसेच चाचणी करण्यासाठी ही निविदा मागवली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.