शोभा नाखरे यांच्या लेखणीतून दिव्यांगांच्या कर्तृत्वाची ‘दिव्य भरारी’

135

दिव्यांगासाठी शिक्षणदानाचे कार्य केलेल्या शिक्षिका आणि राष्ट्रपती पदक विजेत्या शोभा नाखरे यांच्या ‘दिव्य भरारी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले असून ते वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. देश-विदेशात आपली कारकिर्द यशस्वी करणार्‍या तसेच दिव्यांग असूनही अविश्वसनीय कर्तृत्व सिद्ध केलेल्या निवडक १८ जणांच्या कार्याचा आढावा यात घेण्यात आला आहे.

‘दिव्य भरारी’ या पुस्तकाची प्रस्तावना रेणूताई गावस्कर यांची असून पुस्तकाचे प्रकाशन रामचंद्र प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे. पुस्तकाचे समर्पक मुखपृष्ठ छाया घाटगे आणि आतील चित्र सागर बडवे यांनी रेखाटले आहे.

सर्वांना कर्तृत्ववान होण्याची प्रेरणा मिळावी हा उद्देश

नुकत्याच झालेल्या पॅराऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केलेला सुयश जाधव, राष्ट्रपती पदक विजेता जलतरणपटू सागर बडवे, असामान्य नृत्यांगना प्रेरणा सहाणे, उद्योजक श्रुती आणि वरुण बरगाले, जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत सहभागी झालेली देवांशी जोशी, दृष्टीहीन असून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची हाताळणी करणारे तसेच प्रशिक्षण देणारे सागर पाटील, राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरण वर्गातील रोल मॉडेल ठरलेला राष्ट्रपती पदक विजेता प्रथमेश दाते, ऑलिंपिंकमध्ये प्रतिनिधीत्व केलेले सत्यप्रकाश तिवारी, ट्रेकिंगमध्ये विक्रम करणारी राष्ट्रपती पदक विजेती नेहा पावसकर, अपूर्वा जोशी-दामले, अनुजा संखे, भरत घोडके, कशिश छाब्रा, योगिता तांबे, अक्षय परांजपे, कल्पना खराडे, सुनील गावकर, जतीन आणि रश्मी पाटील, मानसी साळवेकर अशा कर्तृत्ववान व्यक्तींच्या प्रेरणादायी दिव्य भरारींविषयी माहिती यात दिली गेली आहे. त्यातून सर्वांनाच कर्तृत्ववान होण्याची प्रेरणा मिळावी, असा उद्देश असल्याचे लेखिका शोभा नाखरे यांनी याविषयी बोलताना सांगितले.

( हेही वाचा : राज्यातील पहिल्या व्याघ्र प्रकल्पाला ४७ वर्षे पूर्ण! )

कर्तृत्ववान दिव्यांगांची ‘दिव्य भरारी’ साकारणारे हे पुस्तक म्हणजे त्यांच्यातील प्रयत्न, जिद्द, चिकाटी, इच्छाशक्ती, मनोबल, सहनशीलता यांचा प्रत्यय घडवून देणार आहे. स्वतःला सिद्ध करताना त्यांना आणि पालकांना कराव्या लागलेल्या संघर्षाचेही यात वर्णन आहे. त्याशिवाय प्रत्येकाचे कार्य हे समाजातील सर्व घटकांना मार्गदर्शन तसेच जगण्याची नवी उमेद, नवी उर्जा देऊन मनात प्रेरणेचा स्फुल्लिंग निर्माण करतात. या क्षेत्रातील मुलांना घडविण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या संवेदनशील लेखिका शोभा नाखरे यांनी त्यांना शब्दबद्ध केले आहे. त्यामागे त्यांचीही जिद्द, चिकाटी आणि महत्वाकांक्षा असल्याचे ज्येष्ठ समाजसेविका रेणूताई गावस्कर यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.