मनी लॉन्डरिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी युक्तिवाद करताना दाऊदबद्दल काही वेगळे सांगायला नको, तो एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे, दाऊदने अनेक ठिकाणी बेनामी संपत्ती विकत घेतली आहे, त्याची बहीण हसिना पारकर ही त्याची इथली मुख्य हस्तक होती, तिच्या माध्यमातून मोठी संपत्ती गोळा केली. कुर्ला येथील एक विवादीत संपत्ती ही मुळातच ‘डी’ गँगच्या हस्तकांशी संबंधित होती. टेरर फंडिंग केले जात होते. तिची संपत्ती नवाब मलिकांच्या कुटुंबियांच्या मालकी हक्क असलेल्या कंपनीच्या नियंत्रणात आहे, त्यामुळे मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिकांसाठी १४ दिवसांची कोठडी मागितली. आरोपीला ताब्यात घेऊन अधिक सखोल चौकशीची गरज आहे, असे ईडीचे वकील एएसजी अनिल सिंह म्हणाले.
ईडीच्या तपासात असे निष्पन्न झाले की, कुर्लामधील गोवावाला कंपाऊंड मालमत्ता वारसा हक्काप्रमाणे मरियम आणि मुनिरा प्लंबर यांच्या मालकीची होती. ती मालमत्ता नवाब मलिक यांच्या मालकीच्या कंपनीने दाऊदच्या डी-गॅंगच्या लोकांशी संगनमत करून विकत घेतली, असा दावा ईडीने केला. दाऊदची बहीण हसीना पारकरचा साथीदार सलीम पटेलने मुनिराच्या कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर करत तिची मालमत्ता पारकरच्या नावे केली, पारकरने ती मलिक यांना विकली, त्यामुळे मलिक यांचाही गुन्ह्यात सहभाग आहे, असेही सिंह म्हणाले.
टेरर फंडिंग हा शब्दाचा उल्लेख नको! – अमित देसाई
त्यानंतर नवाब मलिकांतर्फे जेष्ठ कायदेतज्ञ अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. आरोपीकडून काहीही हस्तगत करण्यात आलेले नाही, बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले, २० वर्षांनी हे प्रकरण उकरून काढले जातंय, कोणताही पुरावा नाही, केवळ काही माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आणि न्यायव्यवस्थेला त्रास नको म्हणून थेट १४ दिवसांची पोलीस कस्टडी मागितली जात आहे? जे काही पुरावे उपलब्ध आहेत ते याप्रकरणातील सहआरोपींबाबत उपलब्ध आहेत त्यांच्याशी नवाब मलिकांचे काहीही देणघेणे नाही, त्यांना ताब्यात घेऊन ईडीने खुशाल आपला तपास करावा, मलिक यांचा डी गँगशी संबंध नाही, ते अनेक वर्षांपासून निवडून येत आहे. इकबाल कासकरला अटक केली नसताना मलिकांना अटक का केली? त्यांच्याविषयी टेरर फंडिंग हा शब्दप्रयोग करण्यात येऊ नये, असे वकील अमित देसाई म्हणाले. आरोपींच्या पिंज-यात बराच वेळ उभं केलेल्या नवाब मलिकांना पिंज-यातच बसण्यासाठी न्यायालयाकडून खुर्ची दिली गेली, नवाब मलिकांची मुलगी आणि जावई समीर खान यांच्यासह अन्य काही कुटुंबियही न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित होते.
(हेही वाचा नवाब मलिकांचे मंत्रिपद जाणार, आमदारकीही धोक्यात?)
Join Our WhatsApp Community