नवसाला पावणाऱ्या आणि हाकेला धावणाऱ्या आंगणेवाडीच्या श्री देवी भराडीदेवीच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये खंड पडल्यानंतर आता निर्बंध शिथिल झाल्याने कोरोनाचे सर्व नियम पाळून ही महायात्रा होत आहे. यासाठी प्रशासन आणि आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ सज्ज झाले आहे.
( हेही वाचा : आंगणेवाडी जत्रेसाठी विशेष गाड्या… )
भाविकांसाठी विशेष व्यवस्था
आंगणेवाडी यात्रोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली असून स्थानिक आंगणे कुटुंबीयांची लगबग वाढली आहे. दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत ही यात्रा संपन्न होते. उद्या गुरुवारी ही यात्रा सुरु होत असून पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांना दर्शन खुले होणार आहे. दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी नऊ प्रमुख रांगा आणि दोन विशेष रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. महत्वाच्या व्यक्ती दर्शनासाठी आल्यानंतर इतर भाविकांना खोळंबून राहावे लागू नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळातर्फे देण्यात आली आहे. मंदिर सभोवती भव्य मंडप उभारण्यात आला असून मंदिर परिसर आणि मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
ग्रामस्थ सज्ज
दरवर्षी एसटीतून हजारो भाविक आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी येत असतात. मात्र या वर्षी एसटीचा संप असल्याने भाविकांना इतर पर्यायी वाहनांचा वापर करून आंगणेवाडी गाठावी लागणार आहे. यंदा एकही भाविक दर्शनाशिवाय राहू नये, याकडे सुद्धा आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ विशेष लक्ष देणार आहे. यात्रेसाठी कुडाळ आगारातून विशेष चार एसटी गाड्यांची व्यवस्था केली आहे.
Join Our WhatsApp Community