लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवाला भाविकांच्या अलोट गर्दीत आजपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर होणाऱ्या या भक्ती आणि शक्तीच्या सोहळ्याला भाविकांनी मध्यरात्री पासूनच गर्दी केली. गुरुवारी पहाटे ३.१५ वाजल्यापासून देवीचे दर्शन सुरू झाले आहे. अनेक मान्यवरांनी सकाळपासून देवीचे दर्शन घेतले.
भाविकांची गर्दी
नवसाला पावणारी, हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी देवीची यात्रा आजपासून सुरु झाली. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही जत्रा केवळ आंगणे कुटुंबियांपुरती मर्यादित स्वरुपात ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर आंगणेवाडीची जत्रा भाविकांच्या गर्दीत संपन्न होत आहे. जत्रेसाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास देवीच्या दर्शनाचा आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरु झाला. पहाटेच्या सत्रात मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थिती दर्शवली आहे. यात्रेकरूंची कोणतीही अडचण होऊ नये म्हणून आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी काळजी घेत आहेत.
( हेही वाचा : बापरे! बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आगीत जळून खाक! )
कोरोनाचे नियम पाळून यात्रा उत्साहात सुरू झाली आहे. सकाळपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच भाजपा नेते विनोद तावडे, आशिष शेलार, प्रसाद लाड, अतुल काळसेकर, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, आमदार वैभव नाईक अशा अनेक मान्यवरांनी भराडी देवीचं दर्शन घेतले. उद्या मोड जत्रेने या यात्रेची सांगता होणार आहे.
Join Our WhatsApp Community