ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी मलिकांसाठी मोडला ‘हा’ नियम!

109

दक्षिण मुंबई हा भाग आंदोलनासाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून ठरवण्यात आले आहे. त्यातही मंत्रालयासमोरील भाग अधिक संवेदनशील समजला जातो. त्यामुळे अधिवेशन सोडून अन्य वेळी कोणालाही मोर्चे, निदर्शने मंत्रालय परिसरात करता येत नाहीत. या सर्वांसाठी आझाद मैदान हे ठिकाण ठरवण्यात आले आहे. ठाकरे सरकारने नवाब मलिकांसाठी हा नियम बासणात गुंडाळून ठेवला आणि नवाब मलिकांवरील कारवाईचा निषेध करण्यासाठी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली निदर्शने केली.

कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

नवाब मलिक जिंदाबाद… ईडी मुर्दाबाद… मोदी सरकार हाय हाय… मोदी सरकार चोर है… महाराष्ट्र लढेगा मोदी हारेगा… महाराष्ट्र ना कधी दिल्लीसमोर झुकला ना कधी झुकणार… आवाज कुणाचा महाविकास आघाडीचा अशा जोरदार घोषणा व फलक फडकावत महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी व हजारो कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी पुतळा परिसर दणाणून सोडला.

ईडी आणि मोदींविरोधात घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातून संतापाची लाट उसळली आहे. त्याचाच संताप गुरुवारी समोर आला. नवाब मलिक यांना समर्थन देण्यासाठी व मोदी सरकारचा आणि त्यांच्या केंद्रीय यंत्रणांचा निषेध करण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातील मविआचे कार्यकर्ते मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ जमा झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचे नेते, मंत्री आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा होऊन मोदी व ईडीच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. युवकांनीही मोदी व ईडीच्या नावाने शिमगा घातला.

( हेही वाचा: भ्रष्टाचाराचा कळस! ‘बेस्ट’ने कर्मचाऱ्यांना दिलेल्या सेफ्टी बुटाचेही काही महिन्यांतच तुकडे )

या नेत्यांचा आंदोलनात समावेश

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक, नगरसेवक कप्तान मलिक,सलील देशमुख, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा या आंदोलनात सहभाग होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.