पुण्यातील मानवनिर्मित पाषाण तलावाची सध्या दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या तलावाच्या पुनरूज्जीवनासाठी सांघिक प्रयत्न केले जात असल्याची माहिती पर्यावरणतज्ज्ञ डॉ. गुरूदास नूलकर यांनी दिली. इंग्रजांच्या काळातील गव्हर्नर बंगला (सध्याचा पुणे विद्यापीठ परिसर) आणि पाषाण सुतारवाडी परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली होती.
तलावाचे पुनरुज्जीवन
स्थलांतरित पक्ष्यांचे वसतीस्थान म्हणून हा तलाव ओळखला जात असे. परंतु, ढिसाळ व्यवस्थापन, अनियोजित विकास, प्रदूषण इत्यादींमुळे या तलावाची दुर्दशा झाली आहे. या तलावाचे पुनरुज्जीवन पर्यावरणपूरक व्हावे, यासाठी अभ्यासपूर्ण कृती आराखडा तयार करण्यात आला असून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सहकार्याने पाषाण तलावास मूळ स्वरुप प्राप्त करुन देण्यात येणार आहे. यासंदर्भात ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. गुरूदास नूलकर यांनी सांगितले की, किर्लोस्कर वसुंधराच्या वतीने अतिक्रमण, अस्वच्छता, प्रदूषणच्या विळख्यात सापडलेल्या रामनदीचे पुनरुज्जीवन व्हावे, यासाठी नवनवीन प्रयोग सातत्याने करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाषाण तलावाच्या पुनर्वैभव प्राप्तीसाठी किर्लोस्कर वसुंधराने पुढाकार घेतला आहे.
( हेही वाचा : सिंधुदुर्गची वारी का बनली जगात भारी? )
नैसर्गिक इको सिस्टीम
जल प्रजातींना घातक ठरणा-या बोटींसारख्या सुविधेला परवानगी दिल्याने मानवी हस्तक्षेप वाढला. बावधान, बाणेर, पाषाण या भागात वाढलेल्या शहरीकरणामुळे प्रक्रियामुक्त सांडपाणी सोडले जाऊ लागले. त्यामुळे प्रदूषणात भरच पडली असल्याचे डॉ.नूलकर यांनी सांगितले. पाषाण तलाव परिसर पाणथळ परिसंस्थेने घेरलेला आहे. तलावाच्या पुनरूज्जीवनासाठी नैसर्गिक इको सिस्टीम उभे करणे गरजेचे आहे. खाटपेवाडी, भुकूम, भूगांव, डिआरडीओ अशी टप्प्या टप्प्याने स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. अशी माहितीही पर्यावरणतज्ज्ञांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community