नांदगाव पेठ पोलिसांनी टोलनाका परिसर तसेच आजूबाजूच्या सर्व परिसरांत रात्रीची गस्त वाढवली. पोलिसांनी तातडीने वाढवलेल्या या गस्तीमुळे परिसरातील शेतकरी तसेच वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. नांदगाव पेठ पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण काळे यांनी गस्त वाढवण्यासोबतच याआधी झालेल्या घटनांचा तपास देखील सुरू केला आहे.
घडत होत्या चोरीच्या घटना
नांदगाव पेठ येथील टोलनाक्यावर रात्रीच्या वेळी मोठी मालवाहू वाहने थांबतात. वाहनांमधील चालक-वाहक मध्यरात्री वाहन बाजूला लाऊन निद्रा घेतात. मात्र परिसरात असलेले चोरटे मध्यरात्री चालक वाहक साखरझोपेत असल्याचा फायदा घेत वाहनातील महागडे साहित्य चोरी करण्याचे अनेक प्रकार या महामार्गावर घडले आहेत. शिवाय आजूबाजूच्या शेतातील शेतीचे साहित्य, तसेच उपकरणे देखील चोरट्यांनी लंपास केली. त्यामुळे गावातील शेतकरी वर्गात देखील चिंता निर्माण झाली होती. मात्र वृत्त प्रकाशित होताच पोलिसांनी दाखवलेल्या सजगतेमुळे आता शेतकरी वर्ग तसेच वाहन चालक यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
(हेही वाचाः ब्लॉक कॉलर म्हणजे काय…वाचा…)
पोलिसांनी वाढवली गस्त
पोलिस निरीक्षक प्रवीण काळे यांनी तातडीने रात्रीची गस्त वाढवली असून आता दररोज रात्री पोलिस गस्त वाहन टोल नाका परिसरात सक्रिय असते. शिवाय आजूबाजूच्या परिसरात देखील गस्त वाहन नियमित फिरत असून, त्यामुळे चोरट्यांचा हैदोस तूर्तास तरी कमी आहे. काही शेतांत जुगार असल्याची माहिती देखील बातमीच्या माध्यमातून पोलिसांना देण्यात आली होती. मात्र पोलिसांच्या गस्ती दरम्यान कुठलाच अनुचित प्रकार आढळला नसल्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण काळे यांनी माध्यमांना सांगितले.
Join Our WhatsApp Community