मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक उपचार पध्दतीचे महत्व कमी केले जात असून शीव येथील लोकमान्य टिळक मनपा सर्वसाधारण रुग्णालयातील आयुर्वेदिक बाह्यरुग्ण विभाग बंद करण्यात आला आहे. रुग्णाचा प्रतिसाद कमी असल्याने हे बाह्यरुग्ण विभाग बंद केल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. मात्र, १७ उपनगरीय रुग्णालयांपैंकी केवळ पाच रुग्णालयांमध्येच आयुर्वेदिक विभाग सूरु असून मुंबईत केवळ चार ठिकाणीच आयुर्वेदिक दवाखाने सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
आयुष्य मंत्रालयाकडून आयुर्वेदिक विभागाला स्वतंत्र दर्जा
केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने आयुर्वेदिक विभागाला स्वतंत्र दर्जा दिलेला आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ऍलोपॅथीक विभागाशी समकक्ष दर्जा आयुर्वेदिक विभागाला आहे. यामुळे ऍलोपेथीक डॉक्टरांची समान वेतनश्रेणी आयुर्वेदिक डॉक्टरांना शासनाने आहे.तरीही महापालिकेच्या रुग्णालयामध्ये आयुर्वेदाला महत्व दिले जात नाही. वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, सेठ गो.सु.वै. महाविद्यालय व रा.ए. स्मा. अर्थात केईएम रुग्णालय येथे सन १९८९ पासून आयुर्वेद संशोधन केंद्राबरोबरच आयुर्वेदिक बाह्यरुग्ण विभाग सुरु आहे. याठिकाणी एक कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी व २ रजिस्ट्रार व हाऊसमन असे आयुर्वेदिक वैद्य कार्यरत आहेत. तसेच नायर धर्मादाय रुग्णालयातही आयुर्वेदिक बाह्य रुग्ण विभाग सुरु आहे. सायन रुग्णालय येथे आयुर्वेदिक बाह्य रुग्ण विभाग सुरु करण्यात आला होता, परंतु रुग्णांचा योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे तो बंद करण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा –आजपासून मुंबईत पुन्हा जमावबंदी लागू, काय आहे कारण?)
मुंबईत कुठे आहेत आयुर्वेदिक रुग्णालय
सर्व उपनगरीय रुग्णालयांपैकी वांद्रे पश्चिम येथील के. बी. भाभा रुग्णालय, मालाड पूर्व येथील एम.डब्ल्यू. देसाई रुग्णालय, कांदिवली पश्चिम येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, घाटकोपर राजावाडी रुग्णालय आणि मुलुंड पूर्व येथील स्वा. वि. दा. सावरकर रुग्णालय या पाच ठिकाणी आयुर्वेदिक विभाग कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत विभाग ‘ए’मध्ये महापालिका मुख्यालय, ‘जी/दक्षिण’ मध्ये एलफिन्स्टन रोड व प्रभादेवी आणि ‘के/पूर्व’ विभागात अंधेरी येथे अशाप्रकारे चार आयुर्वेदिक दवाखाने आहेत. याव्यतिरिक्त सरकारी व ट्रस्ट मार्फत चालविली जाणारी आयुर्वेदिक रुग्णालयेही चालवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक विभाग सुरु करण्यात आणि सदर विभागाचा कार्यभार सांभाळण्याकरिता आयुर्वेदातील डॉक्टरांची विभाग प्रमुख (आयुर्वेदिक विभाग) नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती.
Join Our WhatsApp Community