शुक्रवारी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली. आज मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली, उद्या केंद्रीय तपास यंत्रणा मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या घरावर धाड टाकू शकतात. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने अशा प्रकारच्या कारवाया होत असल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली.
काय म्हणाले राऊत
पत्रकारांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, महापालिका निवडणुकीची प्रक्रिया महिनाभरात सुरू होत आहे. उद्या महापालिकेच्या शिपायांवरही रेड टाकतील. महापालिकेतील काही शिपाई धनुष्यबाण लावतात. मराठी लोकं आहेत. शिवसेनेवर त्यांचं प्रेम आहेत. त्यामुळे ते धनुष्यबाण लावतात. आता आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. 2024 पर्यंत आम्हाला हे सहन करायचं आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाब, छत्तीसगड या भाजपेत्तर राज्यांना 2024 पर्यंत तपास यंत्रणांचा त्रास सहन करायचा असल्याचे त्यांनी सांगितले. 2024 नंतर पुढे पाहून घेऊ असेही राऊत यांनी म्हटले.
(हेही वाचा – ‘सामना’तून टीकास्त्र; मोदी-शहा हिटलर, तर केंद्रीय तपास यंत्रणा ‘या’ नाझी फौजा!)
राऊतांनी केला दावा
माध्यमांशी बोलताना राऊत यांनी असाही दावा केला की, आगामी मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ही छापेमारी सुरू झाली आहे. दरम्यान, यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच ती रक्कम युएईला पाठवली असल्याची चर्चा आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे आज त्यांच्या घरावर छापे मारण्यात आले आहेत. राजकीय फायद्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणार, खोटे पुरावे तयार करणार, कॅबिनेट मंत्र्याला अटक करणार आणि तुम्हीच राजीनाम्यासाठी आंदोलन करणार. मुख्यमंत्र्यांनाही कोणाचा राजीनामा घ्यायचा याचा अधिकार आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
Join Our WhatsApp Community