राष्ट्रीय शेअर बाजारातील अनियमिततेच्या आरोपावरून सीबीआयने नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) माजी एमडी चित्रा रामकृष्ण यांचे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि सल्लागार आनंद सुब्रमण्यम यांना गुरुवारी रात्री अटक केली आहे.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजबाबत धक्कादायक खुलासा
भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड नॅशनल स्टॉक एक्स्चेंजबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. सेबीच्या अहवालानुसार, एनएसईमध्ये आनंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती एका ‘योगी’ अर्थात अध्यात्मिक गुरुच्या सांगण्यावरुन झाली होती. सुब्रमण्यम यांना शेअर बाजाराचा कुठलाही अनुभव नसताना त्यांचा वार्षिक पगार 15 लाखांवरुन सुमारे साडेचार कोटी करण्यात आला होता.
(हेही वाचा – ‘सामना’तून टीकास्त्र; मोदी-शहा हिटलर, तर केंद्रीय तपास यंत्रणा ‘या’ नाझी फौजा!)
या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता
सीबीआय गेल्या शुक्रवारपासून एनएसईचे माजी सीईओ चित्रा रामकृष्ण, बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रवी नरिन यांची चौकशी करत होते. त्यावेळीच या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सेबीच्या आदेशानुसार समोर आलेल्या अलीकडील तथ्यांच्या प्रकाशात मूळ एफआयआरचा विस्तार करण्यात आला. सेबीच्या आदेशात सुब्रमण्यन यांची नियुक्ती करण्यात आणि एक्सचेंजचा आर्थिक डेटा रामकृष्ण यांनी अज्ञात त्रयस्थ व्यक्तीला लीक करण्यात प्रशासनात त्रुटी असल्याचा आरोप केला आहे.