दाऊदशी आर्थिक व्यवहार असल्याच्या आरोपाखाली ईडीच्या कोठडीत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील जे.जे रूग्णालयात उपचार सुरू आहे. पोटदुखीचा त्रास सुरु झाल्याने नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ईडीने बुधवारी 8 तासांच्या चौकशीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली होती. ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना तपासणीसाठी मुंबईतील भायखळा येथे असलेल्या जे. जे. रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यानंतर पोटदुखीची समस्या वाढल्याने नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(हेही वाचा – यंदा मनसेचा वर्धापन दिन पुण्यातच का? जाणून घ्या कारण)
… आणि लक्षात आले मलिकांची प्रकृती खालावली
मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात आणले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर नवाब मलिक यांना अर्धा तासात पुन्हा ईडीच्या कार्यालयात नेणे, अपेक्षित होते. मात्र, तीन ते चार तास उलटूनही नवाब मलिक यांना जे.जे. रुग्णालयातून बाहेर नेण्यात आलेले नाही. याची अधिक चौकशी केली असता नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली.
महाविकास आघाडीला मोठा धक्का
ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिकांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, नवाब मलिक यांना नेमका कोणता त्रास होत आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. न्यायालयाने यापूर्वीच नवाब मलिक यांना ईडी कोठडीत घरचे जेवण आणि औषधे उपलब्ध करुन देण्यास परवानगी दिली होती. ईडीने २३ फेब्रुवारी रोजी सकाळीच नवाब मलिकांच्या घरी धडक दिली होती. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह मलिक दाखल झाले होते. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
Join Our WhatsApp Community