मुंबई महापालिकेच्यावतीने सन २०१५-१६मध्ये घरोघरी ओला व सुका कचरा वर्गीकरण करून ठेवण्यासाठी दहा लिटर क्षमतेच्या दोन कचरा पेट्यांचे वाटप करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात साडेबारा हजार आणि सन २०१७-१८ मध्ये दहा हजार कचरा पेट्यांची खरेदी करण्यात आली. परंतु यापुढे दहा लिटर क्षमतेच्या कचरा पेट्यांचे वाटप केले जाणार नसले तरी यापूर्वी वाटप करण्यात आलेले डबे हे नियमाबाह्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाच्या नगरविकास विभागाने नगरसेवक स्वेच्छा निधीतून करावयाच्या कामासंबंधी जारी केलेल्या परिपत्रकानुसार खासगी संस्थांची, सहकारी संस्थांची तथा वैयक्तिक लाभधारकांची कामे मार्गदर्शक तत्वात बसत नसल्याने आता या डब्यांचे वाटप न करण्याचा विचार करून नगरसेवकाच्या निधीतून १० लिटर क्षमतेचे डबे घेण्याचे वगळण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : महापालिका रुग्णालयांमध्ये आयुर्वेदाला महत्व किती? जाणून घ्या )
कचरा डब्यांचे वाटप करणार नाही
विभागातील घराघरातील सुका व ओला कचरा वेगवेगळा संकलित करण्यासाठी १० लिटर क्षमतेच्या एचडीपीईच्या बंदिस्त कचरापेट्यांचा पुरवठा नगरसेवकांच्या मागणीनुसार नगरसेवक निधीतून पुरवण्यात आल्या होत्या. सन २०१६-१७ मध्ये प्रथम ९३.४२ रुपये प्रति नग याप्रमाणे १२ लाख ४८ हजार कचरा पेट्या खरेदी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. तब्बल ११ कोटी ६५ लाख ८८ हजार रुपयांचे हे डबे खरेदी करण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर २०१७मध्ये १० लिटर क्षमतेच्या १० लाख कचरा पेट्यांची खरेदी करण्यात आली होती. परंतु आता हेच कचऱ्याचे डबे देण्याचे काम मार्गदर्शक तत्वात बसत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट करत यापुढे अशाप्रकारचे डबे न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.