आत्महत्या आणि आत्मार्पण किंवा समाधी यात काय फरक आहे?

26 फेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन. त्यानिमित्त आत्मार्पण आणि आत्महत्या याबाबतीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपली भूमिका मांडली आहे.

292

व्याधिग्रस्त झालेली व्यक्ती त्यातून बरी होत नाही. अशावेळी ती दुःखाच्या टोकाला जाते. स्वतःचे जीवन आनंदाने आणि सुखाने जगता येत नाही म्हणून स्वतःवर मरण ओढवून घेते. याला आत्महत्या म्हणतात.

त्याचबरोबर जीवनामध्ये आलेल्या अनेक अडचणी, कटकटी, संकटे यामुळे हताश, निराश झालेल्या व्यक्तीला जगण्यातल्या सुखापेक्षा मरणातले सुख अधिक प्रिय वाटू लागते. अशा निराशाजनक अवस्थेत जी व्यक्ती स्वतःचे जीवन नष्ट करते त्याला आत्महत्या म्हणतात.

(हेही वाचाः धर्म घराबाहेर येणं योग्य आहे का? काय आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत)

आत्मार्पण म्हणजे काय?

एखादी व्यक्ती आयुष्यभर विशिष्ट ध्येय ठेऊन जीवन जगते. ते जीवन जगताना अनेक संकटे, अपमान, दुःख, अडचणी, अशा अनेक आपत्तींना तोंड देत आपल्या ध्येय पथावरून वाटचाल करत असते. त्यानंतर जे कार्य हाती घेतले आहे ते कार्य करण्यासाठी लागणारे शारीरिक बळ जेव्हा त्या व्यक्तीकडे राहत नाही त्यावेळी त्या व्यक्तीला वाटू लागते, आतापर्यंत आपण जे कार्य केले तसे कार्य आपल्या हातून आता घडणे शक्य नाही. त्यामुळे आता आपल्या जीवनाला तसा अर्थ राहिला नाही. विशिष्ट ध्येय पथावरून केलेल्या वाटचालीने पूर्णपणे समाधानी असलेली व्यक्ती आनंदाने, सुखाने आपली जीवन यात्रा संपवण्याचा निर्णय घेते आणि त्याप्रमाणे कृती करते. याला आत्महत्या म्हणता येणार नाही, त्याला आत्मार्पण असे म्हटले जाते.

आत्महत्या ही दुःखापोटी, निराशेपोटी, असहाय्यतेपोटी केली जाते. आत्मार्पण हे पूर्णपणे समाधानाने, आनंदाने , तृप्त मनाने करण्यात येते.

(हेही वाचाः स्वातंत्र्यकवि गोविंद यांच्या कवितांचे सावरकर आत्मार्पण दिनी प्रकाशन)

इतिहासातील उदाहरणे

इतिहासातील काही महनीय व्यक्तींची आपण उदाहरण घेऊ.‌ वैदिक कर्मकांडाचे कट्टर पुरस्कर्ते आणि मीमांसक कुमारिल भट्ट यांनी वैदिक धर्माचा पाडाव करणाऱ्या बौद्ध सिद्धांताचा एकाग्रतेने, एकनिष्ठेने अभ्यास केला. त्या सिद्धांताप्रमाणे आचरण केले. बौद्ध धर्मियांप्रमाणे जीवन जगले. त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्मातल्या जाणत्या, ज्ञानी लोकांबरोबर चर्चा केली, वाद-विवाद केले. त्या वादविवादात कुमारिल भट्ट यांनी बौद्ध धर्मातील पंडितांचा पराभव केला.

वैदिकधर्माच्या विजयासाठी जरी बौद्ध धर्म ग्रंथांच्या वचनांचा आणि आचार-विचारांचा अवलंब आपण केला असला, तरी ते पाप आहे असे कुमारिल भट्ट यांना वाटले. त्याचे प्रायश्चित्त घेण्यासाठी त्यांनी नैसर्गिक मृत्यू येण्यापूर्वी स्वतःचा देह भस्म करून टाकण्याची प्रतिज्ञा केली. त्या प्रतिज्ञेला अनुसरून त्यांनी आपला देह अग्नीला अर्पण केला. त्यांच्या या कृतीला आत्महत्या न म्हणता अग्निदिव्य, आत्मार्पण म्हणून गौरवण्यात आले.

(हेही वाचाः तरुणांनी वीर सावरकरांचे विचार आचरणात आणावे! अविनाश धर्माधिकारी यांचे आवाहन)

शंकराचार्यांनी आनंदाने देह विसर्जित केला

आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या अद्वैत मताच्या दिग्विजयासाठी संपूर्ण हिंदुस्थानात संचार केला. ते जेव्हा कामरूपमध्ये म्हणजे आजच्या आसाममध्ये गेले, तेव्हा तिथे शाक्त पंथातील विद्वानांशी वादविवाद झाला. त्या वादविवादात त्यांनी विजय संपादन केला. शाक्तपंथातल्या लोकांना शंकराचार्यांचा हा विजय पचवता आला नाही. त्यांनी शंकराचार्यांवर विषप्रयोग केला. त्यातून ते वाचले तरी या विषप्रयोगामुळे त्यांच्या प्रकृतीला अपाय झाला. कामरूपमधून ते कश्मीरला आले. कश्मीरला आल्यावर त्यांनी दिग्विजयाची पूर्णता केली आणि आपला चौथा मठ तिथे स्थापन केला. हिंदुस्थानात शृंगेरी, द्वारका, पुरी आणि कश्मीरचा मठ मिळून चार दिशांना अद्वैत मतप्रचारार्थ चार धाम स्थापण्याचे त्यांचे ध्येय पूर्णत्वास गेले. त्यावेळी ते तरुणच होते. तरीही त्यांनी आपले जीवन समाप्त करण्याचा निर्णय घेतला. महान योग्यांच्या पूर्वपरंपरेला अनुसरून त्यांनी गुहेत प्रवेश केला आणि योगासनात बसले. आपल्या शिष्यांना गुहेचे द्वार बंद करण्यास सांगितले. अशाप्रकारे शंकराचार्यांनी अत्यंत समाधानाने, आनंदाने, योगमार्गाने देह विसर्जित केला.

आद्य शंकराचार्यांच्या या गुहा प्रवेशाला कोणीही आत्महत्या म्हटले नाही. समाधी, आत्मार्पण या नावानेच त्यांचा देहत्याग गौरवला जातो.‌

(हेही वाचाः वीर सावरकरांनी ३ दशकांपूर्वीच फाळणीविषयी केलेले सतर्क! उदय माहुरकर का म्हणाले सावरकर होते द्रष्टा पुरुष?)

गौरांग प्रभूंची जलसमाधी

गौरांग प्रभू हे बंगाल मधील महान कृष्णभक्त होते. त्यांची कीर्ती संपूर्ण हिंदुस्थानात पसरली होती. विविध नगरमधून त्यांनी संचार करून आपल्या बांधवांमध्ये श्रीकृष्ण भक्ती रुजवण्याचा प्रयत्न केला. आयुष्याच्या उत्तरार्धात ते जगन्नाथपुरीला आले तिथल्या सागराच्या तटावर ते सामुदायिक भजन करू लागले. श्रीकृष्णाचे भजन करता-करता त्यांनी सागराच्या जलाशयात समाधि घेतली. त्यांना सर्वत्र श्रीकृष्ण दिसत होता. त्यांच्या या देहत्यागाला जलसमाधी म्हणून गौरवण्यात आले.

माऊलींचा समाधी सोहळा

ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा वयाच्या २१व्या वर्षी स्वतःची जीवन यात्रा संपवली. तारुण्यात त्यांनी हरिपाठाचे अभंग, चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी, शेकडो अभंग आणि अमृतानुभव अशी ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यानंतर त्यांनी देहत्याग करण्याचा निर्णय घेतला. ज्ञानेश्वरांचे वडील बंधू निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरू होते, त्यांनी ज्ञानेश्वरांच्या या निर्णयाचे स्वागत केले. सर्व संतांच्या समक्ष भजनाच्या गजरात स्वतःसाठी बांधलेल्या समाधी स्थानात अत्यंत समाधानाने ज्ञानेश्वर उतरले, पद्मासनात बसले. निवृत्तीनाथांनी स्वहस्तेच समाधी स्थानावर अखेरचा चिरा बसवला. ज्ञानेश्वरांच्या या देहत्यागाला समाधी सोहळा म्हणून गौरवण्यात आले.

(हेही वाचाः रशिया-युक्रेन युद्ध… कोणात किती सामर्थ्य?)

रामदास स्वामींचे आत्मार्पण

रामदास स्वामींनी सुद्धा यवनांच्या बंडाचा समूळ नि:पात करण्याच्या कार्यासाठी आपले जीवन समर्पित केले. महाराष्ट्राच्या भूमीत धर्मयुद्धाची आग पेटवून देण्यासाठी त्यांनी रामदासी पंथाची स्थापना केली. शिवरायांनी शस्त्र बळाच्या जोरावर यवनी सत्तांना परास्त करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यावर समर्थ रामाचा हा दास आनंदित झाला आणि उच्चरवाने उद्घोषिता झाला

स्वप्नी जे देखिले रात्री,
ते ते तैसेचि होतसे ।
हिंडता फिरता गेलो
आनंदवनभुवनी ।।

बुडाला औरंग्या पापी,
म्लेंछ संहार जाहला ।
मोडली मांडिली क्षेत्रे,
आनंदवनभुवनी ।।

उदंड जाहले पाणी
स्नानसंध्या करावया ।
जप तप अनुष्ठाने
आनंदवनभुवनी ।।

शिवराज्याभिषेकानंतर काही वर्षातच शिवराय निजधामाला गेले. त्यामुळे रामदास स्वामींना विलक्षण दुःख झाले. आपले जीवित कार्य संपले हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी अन्नत्याग करून आपला देह श्रीरामचरणी अर्पण केला. त्यांच्या या देहत्यागाला आत्मार्पण असेच संबोधण्यात आले.

(हेही वाचाः चित्रपटात फडकला वीर सावरकरांचा ध्वज, पण झाली एक चूक…)

सावरकरांची वैज्ञानिक समाधी

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा या संतांच्या पाऊलखुणांवरून वाटचाल करत आपली जीवन यात्रा स्वेच्छेने पूर्ण केली. त्यांनी रामदास स्वामींप्रमाणेच अन्नत्याग करून आपला देह विसर्जित केला. त्यामुळे सावरकरांच्या या देहत्यागाला आत्मार्पण असेच संबोधले जाते. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी सावरकरांच्या या देहत्यागाला सावरकरांची वैज्ञानिक समाधी म्हणून गौरवले.

म्हणून सावरकरांनी जलसमाधी घेतली नाही

सावरकरांनी आपली जीवन यात्रा संपवण्याचा मनाशी ठाम निश्चय केला होता. त्यांना जलसमाधी घ्यायची होती. तसे त्यांनी त्यांचे स्वीय सचिव बाळाराव सावरकर यांना सांगितले होते. वरळीचा तट, नरिमन पॉईंट, या ठिकाणी सावरकर, बाळाराव सावरकरांना घेऊन गेले होते. बाळारावांना त्याच वेळी सावरकर जलसमाधी घेण्याच्या विचारात आहे अशी शंका आली, त्यांची ती शंका खरी ठरली. कारण सावरकरांनी त्यांच्याशी आत्महत्या आणि आत्मार्पण याबाबत चर्चा केली. विविध संतांच्या जीवन समाप्तीच्या पद्धतींचे वर्णन केले. त्यानंतर सावरकरांनी जलसमाधी घेण्याचा विचार रहित केला. कारण जर सावरकरांनी बाळारावांना समवेत घेऊन समुद्र तटावरून जलसमाधी घेतली तर सावरकरांच्या हत्येचा आरोप बाळारावांवर येईल, अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यांनी जलसमाधी न घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते कधीही समुद्रकिनाऱ्यावर गेले नाहीत.

(हेही वाचाः बाळासाहेबांसारखे भाषण करायला जमत नाही, कारण…! उद्धव ठाकरेंनी दिली कबुली)

सावरकरांचा युक्तिवाद डॉक्टरांनाही पटला

सावरकरांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणाऱ्या डॉक्टर सुभाष पुरंदरे , डॉक्टर फडके आणि डॉक्टर साठे यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की आता त्यांना जगायचे नाही. सावरकरांनी आपला विचार विविध युक्तिवाद करून डॉक्टरांना पटवून दिला. अखेरीस डॉक्टरांना सावरकरांचा युक्तिवाद खोडून काढता आला नाही. सावरकरांनी अखेरचे उपोषण सुरू केल्यावर डॉक्टरांनी स्पष्ट शब्दात सांगितले, “तात्यांची इच्छा असेल तरच त्यांना औषध दिले जाईल. त्यांची इच्छा असेल तरच त्यांना इंजेक्शनही दिले जाईल. तात्यांची इच्छा नसेल तर डॉक्टरांनी कितीही प्रयत्न केले तरी काही उपयोग होणार नाही.”
अखेरीस सावरकरांनी अन्नत्याग करून आपला देह विसर्जित केला. तो दिवस होता २६ फेब्रुवारी १९६६.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.