मागील २ दिवसांपासून रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धाकडे अनेक देशांचे लक्ष लागलेले आहे. या प्रकरणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला अमेरिका किंवा रशिया या दोघांपैकी एकाच्या तरी एकाच्या बाजुने उभे राहण्याची वेळ आली. त्यावेळी मात्र भारताने अप्रत्यक्षपणे युद्ध नको तर बुद्ध हवा, अशी भूमिका मांडली. जेव्हा युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाविरोधात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ठराव मांडण्यात आला. यावर सर्व देशांना मतदान करावे लागले होते. यावेळी भारतामध्ये अत्यंत धोरणीपणा दाखवत रशियाच्या हल्ल्याचा निषेध केला, परंतु मतदान टाळले. भारतासोबच मतदानापासून दूर राहणाऱ्या देशांमध्ये चीन आणि यूएई या देशांचाही समावेश आहे.
‘संवाद’ हाच एकमेव मार्ग
युक्रेन संघर्षाच्या निमित्ताने जगातील दोन महासत्ता अमेरिका आणि रशिया एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या. एकीकडे अमेरिका हा भारताचा राजनैतिक भागीदारी मित्र देश आहे, तर दुसरीकडे वर्षानुवर्षे खंबीर मित्राची भूमिका बजावत असलेला रशिया आहे. संयुक्त राष्ट्रासमोर भारताचे स्थायी प्रतिनिधी टी एस तिरुमूर्ती यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. ‘सर्व सदस्य देशांनी रचनात्मक पद्धतीने पुढे वाटचाल करण्यासाठी तत्त्वांचा आदर करणे आवश्यक आहे. याक्षणी हे कितीही कठीण वाटत असले तरी ‘संवाद’ हाच मतभेद आणि वाद सोडवण्याचा एकमेव मार्ग आहे. मुत्सद्देगिरीचा मार्ग बाजुला सारणे ही खेदाची गोष्ट आहे. आपल्याला याच मार्गाकडे परत यावे लागेल. या सर्व कारणांमुळेच भारताने या प्रस्तावापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे’, असे म्हणत तिरुमूर्ती यांनी संयुक्त राष्ट्रासमोर ठामपणे भारताची भूमिका मांडली.
(हेही वाचा धर्म घराबाहेर येणं योग्य आहे का? काय आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत)
भारताने व्यक्त केली चिंता
‘युक्रेनमधील सद्य घडामोडींमुळे भारत चिंतेत आहे. हिंसा आणि शत्रुत्व ताबडतोब संपुष्टात आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जावेत, अशी आमची विनंती आहे. मानवी जीवनाच्या किंमतीवर कोणत्याही प्रश्नावर तोडगा काढला जाऊ शकत नाही. युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसहीत भारतीय समुदायाच्या कल्याण आणि सुरक्षेबाबतही आम्ही चिंतित आहोत, असेही तिरुमूर्ती यांनी यावेळी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community