रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये असलेल्या भारतीयांना घेऊन भारतात येणा-या पहिल्या विमानाने बुखारेस्ट येथून उड्डाण केले आहे. रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून रवाना झालेले एअर इंडियाचे हे विमान 219 भारतीयांना घेऊन मायदेशी परतणार आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. रात्री 8 पर्यंत मुंबई विमानतळावर हे विमान दाखल होणार आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या भारतीयांना दिलासा मिळाला आहे.
अहोरात्र प्रयत्न सुरू
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीट करत, आपण युक्रेनमधील भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी अहोरात्र काम करत असल्याचे सांगितले आहे. परराष्ट्र मंत्री या नात्याने मी स्वतः यावर वैयक्तिक लक्ष ठेऊन आहे. 219 भारतीयांना भारतात परत आणणारे विमान हे रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून रवाना झाले आहे. सर्वच भारतीयांना लवकरात लवकर परत आणण्यात येणार आहे. यावेळी डॉ एस जयशंकर यांनी ट्विट करत रोमानियाचे परराष्ट्र मंत्री Bogdan Aurescu यांचे आभार देखील मानले आहेत.
My heartfelt thanks to FM @BogdanAurescu for his Government’s cooperation. https://t.co/L0EknlIrHT
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) February 26, 2022
मुंबई विमानतळावर होणार आगमन
केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि महापौर किशोरी पेडणेकर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मायदेशी परतणाऱ्या भारतीयांचे स्वागत करणार आहेत. रात्री 8च्या सुमारास हे विमान मुंबईत दाखल होणार आहे. भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी, भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्याशिवाय कोणत्याही सीमेवर नागरिकांनी जाऊ नये अशा सूचना अडकलेल्या नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
Join Our WhatsApp Community