“हे तर मराठी भाषेचे विरोधक”, राऊतांचा रोख नेमका कुणाकडे?

131

जगभरात साजरा केला जाणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मराठी भाषेसंदर्भात खंत देखील व्यक्त करताना ते म्हणाले की, प्रधानमंत्र्यांपासून अनेक नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देतात, उल्लेख करतात. पण महाराष्ट्रामध्ये आम्हाला त्या शिवरायांच्या भाषेसाठी तुमच्याकडे सतत दारात येऊन भीक मागावी लागते याचा कुठेतरी विचार व्हायला हवा. यासह त्यांनी भाजपावर देखील हल्लाबोल केला.

(हेही वाचा – मुंबई महापालिकेकडे ९२ हजार ६३६ कोटींची मुदतठेवींची रक्कम!)

राऊतांनी केला हल्लाबोल

केंद्र मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात सुद्धा राजकारण करत आहे. श्रेय कोणीही घ्या पण मराठीचा मान राखा, असेही राऊत म्हणाले. भाजपने मराठी पाट्यांना विरोध केला आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, भाजपची कायम भूमिका दुटप्पी असते. मराठी माणसाची एका बाजूला बदनामी करायची. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळू द्यायचा नाही. मराठीची आर्थिक कोंडी करायची. मराठी माणसाच्या हातात पैसे राहू द्यायचे नाहीत. मराठी पाट्यांना विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला मराठी कट्टा यांसारखे कार्यक्रम घेऊन ढोंग करायची. मराठी भाषेचे हे विरोधक भारतीय जनता पार्टीची लोक आहेत, असा आरोप त्यांनी केला.

आपल्या भाषेवर असा अन्याय कुणी सहन करू नये

मराठी भाषेच्या डोक्यावर अभिजात भाषेचा दर्जा असलेला सुवर्ण मुकुट चढवा. महाराष्ट्राच्या जनतेने आणि जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मराठी माणसाने ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. भाषेवरील अन्याय कुणीही सहन करू नये, असं संजय राऊत म्हणाले आहेत. पुढे संजय राऊत म्हणाले की, भाषणामध्ये प्रधानमंत्री पासून अनेक नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देतात उल्लेख करतात आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला त्या शिवरायांच्या भाषेसाठी तुमच्याकडे सतत दारात येऊन भीक मागावी लागते याचा कुठेतरी विचार व्हायला हवा.

राऊतांचा केंद्राला निशाणा

दरम्यान, मुंबई पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने ठाप मारली. या प्रकरणी राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर आरोप केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना असे वाटत आहे की, इन्कम फक्त महाराष्ट्रात आहे. खरंतर, सर्वात जास्त टॅक्स मुंबई आणि महाराष्ट्र केंद्राला पुरवत असतो असे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच, महाराष्ट्राच्या जनतेला कोण किती त्रास देतं याची जनता नोंद घेत आहे, असाही निशाणा संयज राऊत यांनी केंद्राला दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.