मुंबईतील रस्त्यांवर पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याला कारणीभूत ठरणाऱ्या छोटे नाले आणि रस्त्यांवरून छोट्या नाल्यांमध्ये निचरा होणाऱ्या रस्त्यांवरील जलमुखे अर्थात वॉटर एन्ट्रस चेंबर्सची यंदा विशेष दक्षता घेत सफाई केली जाणार आहे. एरव्ही मोठे नाले आणि छोट्यांच्या सफाईकडे लक्ष देणाऱ्या प्रशासनाने यंदा सर्वप्रथम याठिकाणची सफाई करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे कुलाबा ते माहिम व शीव दरम्यानच्या सर्व जलमुखांच्या सफाईवर तब्बल ८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये वाहने भाडेतत्वावर पुरवणारी कंपनी पात्र ठरली आहे.
पावसाळ्याआधी नाले सफाई
पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी तुंबले जाते. मुसळधार पाऊस नसतानाही किरकोळ पावसात छोट्या नाल्यांना जोडली जाणारी जलमुखे ही साफ होत नसल्याने, ही परिस्थिती उद्भवत असती. त्यामुळे याची दखल आता प्रशासनाने घेतली असून नालेसफाईच्या कामांबरोबरच प्रारंभीपासून जलमुखे साफ व स्वच्छ करण्यावर भर देण्याचा प्रयत्न आहे. या अनुषंगाने शहर भागातील दोन्ही परिमंडळांसाठी स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्याकरता या कामांकरता निविदा मागवण्यात आली असून, यामध्ये परिमंडळ एक करता २.७१ कोटी रुपये तर परिमंडळ दोन करता ५.२१कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या दोन्ही कामांसाठी अनुक्रमे हितेश एंटरप्रायझेस आणि भूमिका ट्रान्सपोर्ट या कंपन्या पात्र ठरल्या आहे. यातील भूमिका ट्रान्सपोर्ट ही कंपनी महापालिकेला खासगी वाहने पुरवत असते. त्यामुळे वाहने पुरवणारी कंपनी आता छोटया नाल्यांची सफाई करताना दिसणार आहे. छोट्या नाल्यांची व रस्त्यांवरील जलमुखांच्या सफाईचा पहिला टप्पा हा ३१ मे २०२२ पर्यंत असेल. या पावसाळा पूर्व कालावधीमध्ये ८० टक्के काम केले जाणार आहे.
यांना मिळाले कंत्राट
परिमंडळ १ (वॉर्ड ए,बी,सी,डी व,ई)
कंत्राटदार : हितेश एंटरप्रायझेस
कंत्राट किंमत : २.७१ कोटी रुपये
परिमंडळ २ (वॉर्ड एफ उत्तर व दक्षिण, जी उत्तर व दक्षिण)
कंत्राटदार : भूमिका ट्रान्सपोर्ट
कंत्राट किंमत : ५.२१ कोटी रुपये
( हेही वाचा: ‘हा’ जिल्हा वगळता राज्यभरातील जिल्ह्यांत कोरोना संख्या हजारांखाली )
अत्याधुनिक मशीन वापरुन सफाई
लालबाग ते शीव, माहिम, धारावीमधील मोठ्या नाल्यांची सफाई करणार अशाप्रकारे शहर भागातील लालबाग ते माहिम, धारावी व शीव पर्यंतच्या परिसरातील मोठ्या नाल्याची सफाई ही यंत्रसामुग्री व मनुष्यबळ वापरुन तसेच काही मोठ्या नाल्यातील काही भाग अत्याधुनिक अशा सील्ट पुशिंग पन्टून मशीन व मल्टीपर्पज अम्बीबीअस पन्टुन मशीन वापरुन केली जाणार आहे. तर काही नाल्यातील गाळ हा पन्टून माऊंटेंड पोकलेन व लाँग बुम पोकलेन या मशीन्सद्वारे केला जाणार आहे. यामध्ये १६०९ रुपये प्रति मेट्रीक टनकरता दर दिला जाणार आहे. तर सील्ट पुशिंग पन्टून मशिनद्वारे साफसफाई केल्यास प्रति मेट्रीक टनाचा दर हा २ हजार १९३ रुपये आणि मल्टीपर्पज एम्फीबीयस पन्टून मशीनद्वारे केल्यास प्रति मेट्रीक टनाकरता २ हजार ३६६ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या नालेसफाईकरता १२.६१ कोटी रुपयांचे कंत्राट निश्चित करण्यात आले असून, या कामांसाठी भूमिका ट्रान्सपोर्ट ही कंपनी पात्र ठरली आहे.
Join Our WhatsApp Community